Home अमरावती शिक्षकांचा अपमान करणाऱ्यांनो,याद राखा….(अग्रलेख )

शिक्षकांचा अपमान करणाऱ्यांनो,याद राखा….(अग्रलेख )

2725
0

शिक्षकांचा अपमान करणाऱ्यांनो,याद राखा….(अग्रलेख )12/11/2020
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
स्कंदपुराणात वर्णन केलेला, गुरूचा महिमा सांगणारा उपरोक्त श्लोक आहे. समाजाला घडविणाऱ्या गुरूचा महिमा अनादिकालापासून सर्वश्रुतच आहे. ‘गुरु विना कोण दाखवील वाट…’ असे संत-महात्मे म्हणतात. म्हणजे इतिहास याची ग्वाही देतो, की गुरु हे दिशादर्शी, पथदर्शी असून समाजाचे, मानवजातीच्या उद्धाराचे खरे शिल्पकार आहेत. आर्य चाणक्य हे सुद्धा एक गुरूच होते. धनानंद हा वैभवशाली नंद घराण्याचा राजा होता. पण ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली आणि त्याने भर दरबारात गुरूचा अपमान केला. पुढे त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांनाच माहीत आहे. नंद घराण्याचा विनाश झाला. म्हणूनच चाणक्य म्हणतात, गुरु को साधारण मत समझो. प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते है.’
उपरोक्त वर्णन केल्याप्रमाणे गुरु, शिक्षक हे सुदृढ समाज घडवू शकतात आणि दुर्जनांचा सर्वनाशही करू शकतात. हे ही तेवढेच खरे.
( इतिहास याला साक्षी आहे) आज ना गुरु पौर्णिमा, ना शिक्षक दिन, मग मी गुरुचे वर्णन कशासाठी करत आहे? एवढा गुरूचा महिमा कशासाठी गात आहे? याचे नवल वाटले असेल ना!
पाच-सहा दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रात शिक्षकांचा अवमान करणारा एक अग्रलेख प्रसिद्ध झाला. त्या अग्रलेखाने संपूर्ण शिक्षक वर्ग पेटून उठला. खरे तर त्यामुळेच हा लेख प्रपंच…..
त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सर्व शिक्षक संघटना एकत्र झाल्या आणि त्या संपादकाला फोन करून सळो की पळो करून सोडले. शेवटी जाहीर माफी मागावी लागली. त्या संपादकाने माफी मागितली पण त्याचा उर्मटपणा मात्र कायम होता. शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘मास्तरड्यांनो ‘ यांसारखे संबोधन करणे म्हणजे किती रानटीपणाचे लक्षण आहे, हे आपल्याला कळले असेलच. ते संपादक कधी गुरूकडे शिकलेच नसावे, असे त्यांचे ते लेखातील शब्द प्रयोग वाचून वाटते. कपिपुत्र म्हणून अवमान करून थांबले नाही, तर तुम्ही त्या टोप्या घालून नाचताय. यासारखे निर्लज्जपणाचे लेखन या संपादकाने केले आहे. कारण काय? तर म्हणे आम्ही प्रश्न विचारायचे नाही का? हा कोण प्रश्न विचारणारा? आणि प्रश्न विचारायचे आहेत तर सरकारला जाऊन विचार म्हणावं? मागील आठ महिन्यांपासून शिक्षक घरी बसून पगार घेत आहेत आणि खादाडत आहेत असे हे महाशय म्हणतात. इथे का शिक्षकांना हौस आहे घरी बसायची? मुलांच्या शैक्षणिक नुकसानाची एवढी चिंता आहे, तर यांनी करायला पाहिजे होती ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था. त्या ठिकाणी स्वतःची थोडी अक्कल पाजळली असती, तर किमान एखाद्या शाळेतली संपूर्ण मुले तरी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकली असती. एवढ्या कोव्हिड महामारीत लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी त्यांच्याकडे सोपविलेली सगळी कामे केली आहेत. त्यात पन्नासच्या वर शिक्षकांना कोरोनामुळे आपले प्राणही गमवावे लागले. आणि हे महाशय म्हणतात, की जास्त काम केल्याने मरणार आहात का? हे महाशय तेव्हा झोपले होते का? जेव्हा शिक्षक रेशनिंग, टोलनाके, सर्वेक्षण यांसारखी कामे करत होते, तेव्हा मात्र यांनी आपली लेखणी चालवली नाही.
जे शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात, शाळेत मुलांचे आई-बाबा होवून त्यांना भविष्यासाठी संस्कारित करतात, देशाचा भावी सुजान नागरिक घडवण्यात मोलाची भूमिका बजावतात. या कार्याचे ह्या संपादकाने कितीतरी अवमान करून या सेवाव्रताचे अवमूल्यन केले आहे. अशा विघातक प्रवृत्तीमुळेच समाज रसातळाला जात असतो. एवढ्या पोटतिडकीने बोलायला हा संपादक स्वतःच्या तिजोरीतून पगार करतो का शिक्षकांचा? शिक्षकांच्या पगारावर डोळा आणि बाकीच्यांचे पगार बघायला यांचे डोळे फुटले आहेत की काय? शिक्षक कधीच भ्रष्टाचार करीत नाही, त्यांचे काही दुसरीकडे उत्पन्न देखील नाही, अशा वेळी त्यांना पगार मिळतो ते ही या महाशयाच्या डोळ्यात आले आहे. इकडे म्हणतो, गुरुजनांबद्दल आम्हाला आदरच आहे आणि तिकडे त्यांचा पगार काढतोय, त्यांना खादाड म्हणतोय. सर्व शिक्षक व शिक्षक संघटना एक झाले. त्या संपादकाला जाहीर माफी मागायला लावली, ही गोष्ट शिक्षक विजयाचे द्योतक आहे, पण समाजात अशा सडक्या मानसिकतेचे लोक आहेत ही खूपच मोठी शोकांतिका वाटते.
शिक्षक शाळेत शिकविण्यासाठीच गेलेले असतात पण आजकाल ऑनलाईन आणि व्हाट्सअप मुळे सारे अहवाल ताबडतोब हवे असतात. मग सोडा शिकविणे आणि करा अहवाल. बऱ्याच शाळेत फक्त दोनच शिक्षक असतात. बहुवर्ग अध्यापन तर आता नित्याचेच झाले आहे. एका शिक्षकाकडे 2 वर्ग असतात तर कधी तीन वर्गही असतात. आणि पुन्हा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची अपेक्षा करायची.
त्या अग्रलेखाचे लिखाण बघितले, तर असे वाटते, की या महाशयाचे शिक्षकांशी काहीतरी हाडवैर आहे आणि ते त्याचा सूडच उगवत आहे. खरेतर कोठारी आयोगामध्ये (1964) शिक्षकांची आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक स्थिती सुधारण्याची शिफारस करण्यात आली होती. खूप तुटपुंज्या पगारामुळे शिक्षक स्वतःची शैक्षणिक अहर्ता वाढवू शकत नाहीत आणि गुणवत्ताही वाढवू शकत नाहीत, म्हणून शिक्षकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात यावे, अशी ही शिफारस होती. त्यानंतर शिक्षकांचे पगार वाढत गेले. आज आपण बघतो, की बहुतांश शिक्षक ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एम. फिल. झालेले आहेत. काही शिक्षकांनी पी.एचडी. सुद्धा केलेली आहे. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढण्यावर झाला. आपल्यापेक्षा आजची पिढी खरच खूप हुशार आहे आणि आपल्यापेक्षा दोन पावले पुढे आहे. त्यांच्यासाठी शिक्षकांना देखील आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. विविध कोर्सेस, प्रशिक्षणे घेऊन शिक्षक स्वतःची शैक्षणिक अहर्ता वाढवीत आहेत. देशाचे माजी राष्ट्रपती स्व.एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील शिक्षकांची आर्थिक स्थिती बळकट करण्याची शिफारस केली होती. ज्या देशाचे शिक्षक आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक दृष्ट्या सक्षम असतील तो देश प्रगतीपथावर अग्रेसर होतो. पण या संपादकाच्या डोळ्यात मात्र शिक्षकांचा पगार खूपत आहे.
आज सर्व शिक्षक एकत्र अाले आणि त्या संपादकाला अद्दल घडविली हे बरेच झाले. कारण त्या संपादकाने स्वतःच्याही गुरुजनांशी ‘मास्तरड्यांनो ‘हे शब्द वापरून गद्दारीच केली आहे ना! अशा गद्दाराला योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. शिक्षकांची एकजूटच अशा महाभागांना वठणीवर आणू शकते.
महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना मी आवाहन करते, की अशी शिक्षकांची बदनामी व अवमान करणाऱ्या पत्रकार अथवा संपादक यांना फोन करून आपली वाणी बाटविण्यापेक्षा सरळ पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवावे. आज महाराष्ट्रात शिक्षकांची संख्या लाखोत आहे. असा अपमान शिक्षक खपवून घेणार नाही, हे अशा लोकांना कळायलाच हवे.
                  श्रीमती योगिता जिरापुरे
                          अमरावती
                     मो.9766965516