Home संपादकीय ओझोन संरक्षण… काळाची गरज

ओझोन संरक्षण… काळाची गरज

996
0

ओझोन संरक्षण… काळाची गरज (अग्रलेख),१७//०९/२०२०
आज प्रदूषण ही जागतिक समस्या बनलेली आहे. अमर्याद वृक्षतोड, मानवाच्या सुख – साधनांचा अतिरिक्त वापर यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आरोग्य, हवामान, वातावरण यावर घातक परिणाम झाले व होत ही आहे.
या वातावरणातील प्रदूषणामुळे पृथ्वीच्या संरक्षणाचे कार्य करणारा ओझोन वायूचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे सर्व सजीव सृष्टी धोक्यात आलेली आहे. म्हणूनच १६ सप्टेंबर हा दिवस ओझोन संवर्धन दिन म्हणून साजरा करून समाजात जागृकता निर्माण करण्याची गरज मानवाला पडलेली आहे.
वातावरणातील ओझोन थर व सजीव सृष्टीचे संरक्षण यांचा फार मोठा सहसंबंध आहे. ओझोन थर ही एक नैसर्गिक चाळणी आहे. ज्यातून सूर्याची विनाशकारी, अतिनील किरणे गाळुन पृथ्वीपर्यंत पोहचतात. पण मानवाने केलेले आधुनिकीकरण व त्यांने स्वतःच्या सुख-सोयींसाठी निसर्गाकडे दुर्लक्ष करून अमर्याद आधुनिक उपकरणांचा केलेला वापर यामुळे पृथ्वीचे संरक्षण कवच असणारा ओझोन वायूचा थर दिवसेंदिवस नष्ट होत जात आहे. दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंमुळे जसे शीतकपाट, स्प्रे, वातानुकूलित उपकरणे यातून सीएफसी वायू बाहेर पडतो. क्लोरोफ्ल्युरो कार्बन, ब्रोमीन, हॅलोजन या वायूमुळे ओझोन थराचे फार मोठे नुकसान होते. जागतिक तापमान वाढ, दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे अशा अनेक समस्या त्यामुळे उद्भवलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे ओझोन थर कमी झाल्याने मानवाच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. सनबर्न, त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार, अशाच प्रकारे संपूर्ण सजीव सृष्टीवर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्याचप्रमाणे वनस्पतींचे अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा या कारणांमुळे मंदावते. मानवाच्या नवीन शोधांमुळे व आधुनिकीकरणामुळे असा सतत पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला आणि अमर्याद वृक्षतोड होत राहिली तर ओझोन संवर्धन करणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येईल. म्हणूनच पर्यावरण संरक्षण करण्यासाठी व सजीवसृष्टीला वाचवण्यासाठी ओझोन थराचे संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याकरिता ओझोन थराचे संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे, कारखाने उद्योग प्रक्रिया यातून निघणारे प्रदूषण करणारे वायू व धूर नियंत्रित करणे, क्लोरोफ्ल्युरो कार्बन ज्या वस्तूंचा वापरातून निर्माण होतो त्या वस्तूंचा वापर कमीत कमी करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे, तर ओझोन थर संरक्षण करणे ही आज काळाची गरज बनली आहे. नाहीतर कदाचित जागतिक तापमान वाढ, पाण्याची पातळी वाढून जलप्रलय येण्यास वेळ लागणार नाही. आधीच अनेक व्याधींनी त्रस्त मानव, अन्न उत्पादकता कमी झालेली झाडे अशा अनेक समस्या उद्भवून सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने असे म्हणावेसे वाटते की,
उठ मानवा जागा हो,
पर्यावरणाचा तू रक्षक हो ||
निरामय सृष्टीचा तू,
खराखुरा संरक्षक हो ||
निसर्गाने दिलेल्या सुंदर सृष्टीच्या व पर्यावरणाच्या र्‍हासाला मानवीय आधुनिकीकरण कारणीभूत आहे. म्हणून मानवाने स्वतःच्या निरामय जीवनासाठी या हरित सृष्टीला वाचवण्यासाठी ओझोन थराचे संरक्षण करण्याकरिता आपल्या कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या गोष्टीचे महत्त्व जाणूनच जागतिक पर्यावरण संघटनांकडून सुद्धा वारंवार ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जातात. त्यानुसार मानवाने स्वतःच्या गरजा कमी करून निसर्गाकडे जाण्याची गरज आहे. त्यातूनच ओझोन थराचे संरक्षण होईल व पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराचे संवर्धन होईल.
           निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
                सहाय्यक शिक्षक
         जिल्हा परिषद शाळा बऱ्हाणपूर
               पं. स. मोर्शी
               ९३७११४५१९५