Home अमरावती महिला सक्षमीकरण- काळाची गरज

महिला सक्षमीकरण- काळाची गरज

966
0

महिला सक्षमीकरणकाळाची गरज (लेख)

मुलीच्या हाकेने सुनिता भानावर आली. कपडे शिवता शिवता आपण कसल्या विचारात गढून गेलो होतो, याचे तीलाच नवल वाटले. मोठ्या हुद्दयावरच्या साहेबाची मुलगी असणारी सुनीता आज एका दहा बाय दहाच्या खोलीत नवरा व मुलगा-मुलगी घेऊन तुटका फुटका संसार करत होती. दिसायला काळी सावळी होती, म्हणून तिला कोणीच पसंत करत नव्हतं. शेवटी एका मुलानं कसंतरी पसंत केलं. वडिलांनी कसलाही विचार न करता तिचं लग्न लावून दिलं होतं. तीने घरात कमवावे. नवऱ्याने मस्त व्यसन करावे, तिच्या पैशावर मजा मारावी. मुलीने दहावी झाल्यावर शिक्षण सोडून टेलरिंगचे काम करायला सुरुवात केली. मुलगा शिकतो आहे आणि दोघीही मायलेकी रात्रंदिवस कष्ट करून त्याला शिकवत आहेत. सुनीताचे आपल्या मुलीसाठी खूप मन दुखते. तिचेही भाग्य आपल्यासारखे फुटू नये म्हणून ती देवाला विनवणी करत राहते.

सुनिताच्या मुलीसारख्याच अशा कितीतरी मुली आहेत, की ज्यांना शिकण्याची इच्छा असूनही केवळ कुटुंबाच्या सांभाळ करावा लागत असल्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून मिळेल ते काम स्वीकारावे लागते. तशी आपली परंपराच, की अजूनही  मुलींच्या शिक्षणाकडे कुटुंबाचा, समाजाचा किंवा सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक दिसत नाही. 1990 मध्ये गठीत झालेल्या समितीने सरकारला मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा म्हणून विविध उपाययोजना सांगितल्या होत्या. पुढे 1992 पासून उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना इत्यादी योजना अमलात आल्या पण त्याचे परिणाम मात्र फारसे समाधानकारक दिसून आले नाहीत. मुलींनी किमान बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करावे म्हणून मोफत पास योजनासुद्धा राबवली जाते. पण तरीही सारे अपूर्णच.

महिला सबलीकरण, सक्षमीकरण या गोष्टी आजही ‘मुंगेरीलाल के सपने’ सारख्याच वाटतात. आपल्या देशात अर्धी लोकसंख्या महिलांची असतांना आजही  काही भागात मुलींचा जन्म म्हणजे शाप समजला जातो. एक तर त्यांना गर्भातच मारून टाकले जाते किंवा जन्मानंतर मारून टाकले जाते.

महिलांची सुरक्षा आणि कल्याण यांची सर्वस्वी जबाबदारी शासनावर असते. महिलांच्या विकासासाठी सरकार बेटी बचाव बेटी पढाव, उज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आदी योजना राबवित आहे.

आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. स्त्री-पुरुष समानतेचा टेंभा मिरवला जातो, पण सत्य मात्र वेगळेच आहे. देशाच्या एकूण कार्य संधी मध्ये 2011-12 मध्ये महिलांचा सहभाग 25 टक्के होता. ग्रामीण भागात 24.5 टक्के तर शहरी भागात 14.1 टक्के अशा वेळी समान कार्य संधीची अपेक्षा कशी करता येईल? खरंतर कौटुंबिक बंधनातून मुक्त होऊन स्वतःचा व देशाचा विचार करण्याची क्षमता विकसित होणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय. स्त्री केवळ कमावती होऊन चालणार नाही, तर  तिने समाजाच्या, देशाच्या विकासास आपला अमूल्य हातभार लावणे महत्त्वाचे वाटते.

स्त्री-पुरुष ही समाजरूपी रथाची दोन चाके आहेत त्यातील एक चाक कमजोर असून कसे चालेल? म्हणूनच देशाचा विकास साधायचा असेल तर दोघांनाही सक्षम बनविणे गरजेचे आहे.

राष्ट्रसंत म्हणतात,

  येथेच समाजाचे चुकले l एकास उचलुनी दुसऱ्यास दाबले l

याचे कटू फळ भोगणे आले l  कितीतरी स्थानी l

आज  शिक्षण असो वा नोकऱ्या यात स्त्रियांचा, मुलींचा टक्का वाढतांना दिसतोय. पण पुढे हे प्रमाण टिकून राहत नाही. आम्हाला नोकरीवाली सून नको असे म्हणणारे बरेच मिळतील किंवा पात्रता असतांनाही पतीदेव कित्येकदा आपल्या पत्नीला केवळ घर व मूल सांभाळण्यासाठी आग्रही असतात. आजही कित्येक इंजिनियर, उच्च पदवी  घेतलेल्या मुली चूल आणि मूल सांभाळताना दिसतात. यासाठी महिलांनी, मुलींनी स्वतः जागरूक असायला पाहिजे. स्वतःचे हक्क कळल्याशिवाय जगता येत नाही. कोऱ्या चेकवर मुकाटपणे सह्या करणारी नोकरीवाली स्त्री असो, की घरातील मंडळींची सेवा  करण्यात धन्यता मानणारी स्त्री असो गुलामी तर अजूनही कायमच आहे ना!

आजही काही महिला मानसिक दास्यात अडकून आहेत. जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेणार नाही. संघटित होऊन हक्कासाठी लढणार नाही तोपर्यंत गुलामी कायमच तिला चिकटुन असेल. जेव्हा एक मुलगी वडीलाचे घर सांभाळते, कुटुंबाला मदत करण्यासाठी शिक्षण सोडते, तेव्हा असे वाटते, की या समाजाची मानसिकता किती सडकी आहे.  ते रत्न गर्भातच मारून टाकायलाही आम्ही कमी करत नाही. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर एक हजार पुरुषांमागे 940 स्त्रिया असे होते. त्यातही महाराष्ट्रात 929  इतकेच होते. स्त्रीभ्रूणहत्या हा भारताला लागलेला एक अभिशाप वाटतो. सन 2003 साली लिंग समानता आणि सहस्त्रादी विकास हे लक्ष ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने विविध धोरणे राबवण्यात आली. उपाययोजना करण्यात आल्या. पण तरीही त्याचा सकारात्मक परिणाम मात्र फारसा दिसून आला नाही. आजही मुलीला गर्भातच मारून टाकण्याच्या घटना सर्रास घडताना दिसतात.

स्त्रियांची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या नराधमांना योग्य धडा शिकवण्यासाठी आज प्रत्येक मुलगी, महिला कणखर अन् सक्षम असली पाहिजे. दामिनी पथके, निर्भया फंड यासारख्या उपाययोजना करूनही महिलांवरील अत्याचार मात्र कमी झालेले दिसत नाही. महिलांवरील अत्याचाराच्या मन सुन्न करणाऱ्या बातम्या ऐकून, वाचून असे वाटते, की सरकार कमी पडत आहे की आम्हालाच जागं व्हायचं नाही. झोपलेल्या व्यक्तीला उठवणे सोपे असते पण झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला उठवणे फार कठीण. स्त्री जोपर्यंत स्वतः जागी होत नाही. तिच्या हक्काविषयी जागरुक होत नाही. तोपर्यंत महिला सबलीकरण, सक्षमीकरण या गोष्टी बोलायला आणि वाचायला चांगल्या वाटतील. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,

जैसी पुरुषांची  संघटीत सेना l स्त्रियांची असावी संघटना l आपल्या सुखदुःखाच्या भावना l प्रकटवाव्या सभा-संमेलनी l

महिलांना स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संपूर्ण अमेरिका व युरोपसह जवळजवळ जगभरातल्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नाकारलेला होता. पुढे महिलांनी एकत्र येत लढा दिला आणि आपला हक्क मिळवला. भारतात मुंबई येथे  पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 साली साजरा झाला. 1975 हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. पुढे त्या निमित्याने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. महिला दिन साऱ्या जगभरात साजरा होत असतो पण आमच्या खेड्यापाड्यातील महिला मात्र कष्ट करत, शरीर थकेपर्यंत कष्टत असते. तिला बिचारीला कधी या दिवसाची माहितीही नसते. मोठमोठ्या कार्यालयात काही संघटनांच्या माध्यमातून हा दिन साजरा होताना दिसतो.

एवढेच म्हणावेसे वाटते, की आमच्या मुलींची येणारी पिढी तरी आपल्या हक्कांविषयी जागरुक असली पाहिजे आणि या समाजात सक्षमपणे, समर्थपणे आपलं कार्य करत देशाच्या विकासात अग्रेसर असली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात संधी मिळवत यशाची उत्तुंग शिखरे गाठणारी असली पाहिजे.

तुझ्या शक्तीची अगाध रूपे,

       सृष्टीला पूर्णत्व देते.

       उद्याचे ते नवतेज

      जन्म तुझ्या उदरातून घेते.

माझ्या सर्व माता-भगिनींना 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’ च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

योगिता जिरापुरे ( शिक्षिका)

जि. प. शाळा मोगर्दा धारणी

मो. 9766965516