Home ताज्या बातम्या लोकहितवादींची लोकाभिमुखता(अग्रलेख)

लोकहितवादींची लोकाभिमुखता(अग्रलेख)

618
0

लोकहितवादींची लोकाभिमुखता (अग्रलेख) ८/१०/२०२०
काही व्यक्ती आपल्या स्वःसामर्थ्याने व कल्पनेने अवतीभोवतीच्या परिस्थितीला नवे रूप, नवे वळण देण्याचा प्रयत्न करून समाजपरिवर्तन घडवून आणतात. लोकहितवादींच्या कार्यकर्तृत्वाची चिकित्सा याच विचारसरणीला आधारभूत मानून करावी लागेल.
लोकहितवादी यांचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे उपनाव सिद्धये होते. लोकहितवादी मराठी शाळेत शिकले. पण पुढे त्यांच्या लक्षात आले की, इंग्रजी शिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्यांनी खाजगीरीत्या इंग्रजीचा अभ्यास केला. पुढे इसवी सन १९४१ ते १९४४ असे तीन वर्ष ते सरकारी इंग्रजी शाळेत शिकले. त्यांचे इंग्रजी शिक्षण १८४४ मध्ये संपले. इंग्रजी शिक्षणामुळे एका नव्या जगाची व नवीन विचारांची झालेली ओळख त्यांना भोवती असलेल्या समाजातील भेदक, विसंगवादाची तीव्र जाणीव करून देऊ लागली. आपल्याभोवती असणाऱ्या स्पर्शास्पर्श, जातिभेद, धार्मिक रीतिरिवाज, सामाजिक वातावरण यावर ते विचार करू लागले. त्यातून ते अधिकच प्रवण झाले. इ.स.१८४४ ते १८७९ पर्यंत सुमारे पस्तीस वर्ष त्यांनी सरकारी नोकरीत व्यतीत केले. नोकरीच्या कालखंडात त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’ व ‘रावबहादूर’ या पदव्या देऊन त्यांचा सरकारने गौरव केला होता. इ.स. १८८० ते १८८२ असे तीन वर्ष ते मुंबईच्या कायदे कौन्सिलचे सभासद म्हणून नियुक्त झाले. रूढार्थाने लोकहितवादी म्हणजे एक बुद्धिमान, कर्तव्य संपन्न, सुप्रतिष्ठित, सरकारी नोकर.
थोर समाजचिंतक म्हणून गोपाळ हरी देशमुख यांची कीर्ती मुख्यता अधिष्ठित आहे. ती त्यांनी शतपत्रे म्हणून लिहिलेल्या निबंधांवर. लोकहितवादी हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर’ नामक पत्रातून ती १८४८ ते १८५० या काळात प्रसिद्ध झाली. ही शतपत्रे वस्तुतः १०८ आहेत. याखेरीज त्यांनी लिहिलेल्या अन्य निबंधाचा समावेश करून लोकहितवादीकृत १९५ निबंधांचा निबंधसंग्रह प्रसिद्ध करण्यात आला. लोकहितवादींच्या या विचारांनी १९ व्या शतकातील प्रबोधनाचा पाया घातला असे यथार्थपणे म्हटले जाते.
लोकहितवादींनी समाजसेवा हा आपला धर्म मानला होता म्हणूनच सरकारी नोकरी करीत असताना लोकजागृतीसाठी झटणारे गोपाळ हरी देशमुख हे सर्वार्थाने लोकहितवादी होते. लोकहितवादींनी केलेल्या समाजसेवेच्या कार्यात त्यांच्या ग्रंथालय चळवळीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. नवी शास्त्रे व ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांची नितांत आवश्यकता आहे असे त्यांनी वारंवार प्रतिपादन केले आहे. लोकहितवादींच्या जीवनावरून असे स्पष्ट दिसते की, एका बुद्धिमान, कर्तृत्वसंपन्न, सुप्रतिष्ठित सरकारी नोकराने आपले आयुष्य कृतार्थ केले. लोकहितवादींचे जीवन हे लोकहीततत्पर विचारवंत, साहित्यिकाचे जीवन आहे. लोकहितवादी हे केवळ एक व्यक्ती होती असे म्हणण्यापेक्षा ते एक संस्था होते असेच म्हटले पाहिजे. एकोणिसाव्या शतकातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आंदोलनाची ही संस्था एक प्रेरणास्थान होते. समाजसेवा हा त्यांनी आपला धर्म मानला होता. त्यांच्या जीवनाची व साहित्याची प्रमुख प्रेरणा ‘लोकसेवा’ हीच होती. ज्या काळात सुशिक्षित मनुष्य सरकारी नोकरी करण्यात प्रतिष्ठा व पैसा मिळविण्यात आयुष्याची यिती कर्तव्यता मानीत होता, त्याकाळात गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी हे सर्वस्व अभिनव नाव धारण करून लोकजीवन घडविण्याचा प्रयत्न आयुष्यभर करीत होते. सरकारी नोकरी करीत असतांना लोकजागृतीसाठी आपल्या लेखणी व वाणीचा सतत उपयोग करणारा लोकाभिमुख साहित्यिक, विचारवंत व कार्यकर्ता दाखविणे अशक्य.
लोकहिताचे प्रण घेतलेले गोपाळ हरी देशमुख कोठेही बाहेर पडले की, त्यांच्याबरोबर त्यांचा नोकर असायचा. त्याच्याजवळ काही साहित्य असायचे. त्यांना कुठेही रस्त्यात आंधळा, पांगळा व्यक्ती दृष्टीस पडला की, त्यास थोडेसे चुरमुरे व एखाद-दुसरी खारीक द्यावी व पाहून – पाहून पैसाही द्यायचा. त्यांना कोठेही दुखणेकरी दिसला की स्वारी उभी राहायची. मग त्याला काय होते याबाबत त्याची चौकशी करून औषध जवळ असल्यास द्यावयाचे. नाही तर त्याला घराकडे ये म्हणून सांगायचे. महारोगी पाहिला कि ते थांबायचेच. त्यांना रोग्याची किळस म्हणून कधी येत नव्हती. ते त्याच्या पट्ट्या त्याच्याकडून काढून जखमा पाहत व त्यावर मलम लावायला देऊन लगेच पट्ट्या बांधीत व अन्न वगैरे देण्यासाठी घरी ये म्हणून सांगत. हा त्यांचा नित्यक्रम असे. लोकहितवादींच्या या सेवेबद्दल उल्लेख करतांना अ.का. प्रियोळकर म्हणतात, “लोकहितवादींनी गोरगरिबांकरिता दवाखाना अगदी इ.स. १८४८ पासून चालविला होता असे म्हणण्यास आधार आहे. लोकांच्या बौद्धिक व मानसिक रोगांकरिता जसे ते प्रभाकर मध्ये लेखांच्या द्वारे औषधोपचार करीत, त्याचप्रमाणे लोकांच्या शारीरिक व्याधी करता धन, औषधे देत.”
लोकहितवादी जेथे जेथे नोकरीच्या निमित्ताने गेले, तेथे तेथे वाचनालय, वकृत्वसभेची त्यांनी स्थापना केली. पुण्यातील छापखाना, रयतेची सभा, दवाखाना व मुलींची शाळा यांना लोकहितवादींच्या आश्रय होता. प्रार्थना समाजाच्या स्थापनेला त्यांनी हातभार लावला. स्वदेशी चळवळीचा गुजरातेत त्यांनी प्रथम पुरस्कार केला. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश या पत्रांच्या संस्थापकांपैकी ते एक होते. विधवा मंडळ, सुतिकागृहे, बालरक्षक मंडळे स्थापण्यासाठी त्यांनी ठीकठिकाणी साहाय्य केले. असे अनेक समाजहिताचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या या लोकहिताच्या, समाजहिताच्या कार्यावरून लोकहितवादी आणि लोकजीवन यांचे परस्पर संबंध किती घनिष्ट होते व समाज जीवनाच्या अभ्युदयासाठी आपली प्रज्ञा आणि प्रतिमा या विचारवंताने कशी पणाला लावली याचे दर्शन घडते. अश्या या ज्ञानयोग्याचे ९ ऑक्टोंबर इ.स. १८९२ मध्ये देहावसान झाले. बुद्धिवादाचा उदघोष करीत राहिलेले रूढार्थाने एक ज्ञानसत्र संपलेले होते. परंतु त्यांचे जीवनकार्य व विचार आपणास सदैव एखाद्या दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या जीवनचरित्राची आणि कार्याची प्रेरणा आपणास व्यक्तीच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये तसेच नवनिर्माणामध्ये सातत्याने प्रेरणा देत राहील.

        निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
             सहाय्यक शिक्षक
जिल्हा परिषद शाळा बऱ्हाणपूर, पं.स. मोर्शी
               9371145195