Home अमरावती गर्दी वृद्धाश्रमातली(अग्रलेख)

गर्दी वृद्धाश्रमातली(अग्रलेख)

605
0

गर्दी वृद्धाश्रमातली(अग्रलेख) 4/11/2020
आज सकाळी सहकुटुंब वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला, निमित्त होते दिवाळी अन् मुलाचा वाढदिवस… बाबांचे म्हणजे सास-यांचे मित्र हा वृद्धाश्रम चालवत. नातांचे वाढदिवस साजरे करून समवयस्कांना आधार व वृध्दाश्रमात मैत्रीचं नातं जपणे हा उद्देश ठेऊन कुटुंबाला लावलेली त्यांचीच सवय अखंड चालविण्यास दरवर्षी प्रमाणे यंदाही ठरविले होते……..
आज दहावे वर्ष वृध्दाश्रमात जाताच दर वर्षीप्रमाणे मनाचा थोडा गलबला होत असलेला जाणवला.सगळी मंडळी जेंव्हा ठीकाणी एकत्र आलीत तेव्हा वाटल वृद्धाश्रमात एवढी माणसं! मनात चर्रर्र झाल. कुठेतरी काळजात विचारांनी थैमान घालायला परत सुरवात केली.वाटल कुठं गेल्या त्या भावना,तो ओलावा, नातं ,ज्याच्या पोटी जन्म घ्यावा त्या नात्यात इतक्या दुरावा असू शकतो का? दिवसेंदिवस आकडा वाढतोय…..
भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला लागलेल खग्रास सूर्यग्रहण एकीकडे कौटुंबिक उन्नतीचा आलेख उंचावत असला तरी दुसरीकडे कुटुंबात लागलेला काळ्याभोर वर्तुळातलं ग्रहण फार भयावह वाटत होतं …..
याला जबाबदार कोण? विचार करण्याची गरज आज जाणवतेय.भारतात कितीतरी वृद्धाश्रम आहेत त्यात असलेल्यांचा एकत्र आकडा बघितला तर आपली ही उद्या अशीच गत होणार नाही ना असा विचार येऊन चिंतन मनन करण्यात मनाला खोल खोल जखम होत असल्याच जाणवल.वाटल नको हे असलं जगणं…
तेव्हाच ठरवल दरवर्षी वृध्दाश्रमात वाढदिवस अन दिवाळी अन्नदान करायची बाबांची सवय मुलांनाही लावायचीच. खर तर मनाच्या एका कोप-यात वाटायच हे वृद्धाश्रम नसते तर माणूस रस्त्यावर आला असता का? छे! छे! इतकी का भारताची माणुसकी खालावली.बड्या बड्या बाता, देणग्या बघून वाटत खरच या देणग्या हे करत असलेले दान म्हणजे पुण्य की वृद्धाश्रम आनाथाश्रम चालवण्यास केलेली व्यवस्था ? प्रश्नचिन्ह पडतात पण उत्तर तितकेच कठीण…
वृद्धाश्रमात ज्या मुलांची मायबाप आहेत त्यांनी मुल जन्माला घातलेली नाहीत का ?आज ख-या अर्थाने गरज आहे ती समाजातल्या प्रत्येक घरातून वृद्धाश्रमातल्या आणि अनाथाश्रमतल्या जगणा-यांचे अनुभव नविन पिढीला देण्याची.म्हणजे पुढे हे अनाथालय व वृद्धाश्रम आपल्या नशीबी येऊ नयेत ही दृष्टी समाजाला तरी मिळेल….
वृद्धाश्रमातल्या चेह-यावरच्या सुरकुत्या आणि नजरेतील आर्त हाक बघतांना वाटत खरच ही माणसं इथे समाधानी आहेत का? इथे तर प्रत्येकाला नियमाची अंमलबजावणी करावीच लागते ना? इथेही काम वाटून दिलेली असतात ना? प्रत्येकाने दिलेल्या दिवशी वाट्याला आलेल काम करण्यात गप्पागोष्टी करूनच दिवस घालवायचा असतो ना ? मग घर का नको ?
असे एक ना हजार प्रश्न समोर उभे ठाकतात. उत्तर एकच असत कुठतरी चुकतंय…..
काय ,कुणाच, कशासाठी,का बिघडतयं हे शोधून मनाच्या कोप-यातल्या पडलेल्या गाठी उसवल्या तर उत्तर सापडत …. जरास मनाच गाठोडं उकलून बघण्याचा प्रयत्न केला तर अस जाणवत कुणालाच वृद्धाश्रमातल जगणं नको असत….या ठिकाणी इतरांची नातवंड नातेवाईकांचे वाढदिवस असो की आणखी कुठलाही कार्यक्रम कायम चेह-यावरच्या हसूत दडलेले आढळतात ते फक्त अश्रू… कधी कधी तर ढसाढसा रडण्याचा सूर
डोळ्यांना लावलेला पदर खूप काही सांगून जातो… कधी पश्चात्ताप,कधी एकटेपणा,कधी शिकस्त झालेलं लाकूड,तर कधी दगड झालेलं मन अशी विविध रूपांतर माणसं बघायला मिळतात या वृद्धाश्रमात…..
आज घराघरात एक किंवा दोन असत्य त्यामुळे पूर्वीसारखा गोतावळा आढळत नाही.पूर्वी एकाला तीन चार अपत्य असायची त्यातल कुणी ना कुणी असायचं दिमतीला सेवेला आज तस नाही.घरातली दोघंही पैशाचं माग धावणारी .कारण काळाची गरज आणि बहुतांश स्वतःच वाढविलेल्या अपेक्षांच ओझं म्हणावं….मग घरात वयस्कांकडून अपेक्षा वाढणारच.नातवंड सांभाळण हा सुद्धा तितकाच महत्वाचा विषय …पूर्वी सारखी आजी आजोबा आज ही जबाबदारी स्वीकारण्यास ही काही ठिकाणी तयार नाहीत.स्वतःच आयुष्य कधी जगाव अस ही वाटत काहींना….अनेक प्रश्न….
त्यात कुठे घरात कधी कुत्र्या मांजरांसारख वाढू ठेवलेल्या ताटाला मायेचा स्पर्श नसतो असते ती केवळ औपचारिकता….आज काल इस्टेट ,अबोला ,एकट्यावर पडणारी जबाबदारी,बेजबाबदारपणा, पैशाचा हव्यास या सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार केला तर वाटत हीच कारण आहेत ना या वृद्धाश्रमातल्या लोकांची… यापेक्षा निराळं ते काय असणार ? यातूनच दूरावताय ना नाती.
आज दोन पिढ्यातल अंतर दूर सारुनी समजून घेण्याची दाराची कवाड बंद झालेली दिसतात .दिसत ते एक भलमोठ कुलुप….. आपसातल्या संवादाला मनाच्या गभा-यात शिरून उत्तर शोधता आल तर हे प्रश्न सुटनार नाहीत का ? माझ्या वेड्या मनाला वाटत असलेली आशा मात्र धूसर वाटत होती.आज संवाद होतो दूरावलेल्या नात्यातल्या चर्चेवर…..का ? गरज आहे ती दोन पिढीतल्या संवादाची……वाटत ही वृद्धाश्रमाची दार कायम बंद होतील ना कि नाही ….मनाची कवाडे सताड उघडी करून बघता येतील का प्रत्येकाला ?…. विचार करत असतांना अचानक हाक ऐकू आली आई केक कापायचा ना ? माझ्या वाढदिवसाचा…….तयारी झाली ग.
भानावर आल्यागत मी स्वतःला विचा-यांच्या गुंत्यातून बाहेर काढले मुलाने केक कापला आणि माझ्या हातावर ठेवला .वाटल खरा वाढदिवस ऐन दिवाळीच्या दिवसात बाबांनी साजरा करण्याची कुटुंबाला ही प्रथा पाडली ही कायम अशीच सुरू ठेवू या…..पिढ्यान पिढ्या…..
वाटत दरवर्षी पेक्षा येणा-या वर्षी वृद्धाश्रमात गर्दी निवळेल…….कदाचित मी संपेलही मी म्हातारी होईपर्यंततरी…..वाट बघूया……
कु.मंजू अ.वानखडे (सौ.वणवे )
                 प्रविणनगर,अमरावती