लोकसभा निवडणूकीसाठी ‘व्हीव्हीपॅट मशीन’ची प्रथमस्तरीय तपासणी

पक्ष प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

अमरावती, प्रजामंच,२७/११/२०१८ 

अमरावती मधील लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यासाठी 3 हजार 592 व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली असून, त्याची प्रथमस्तरीय तपासणी शुक्रवार, दि.30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्र. जिल्हाधिकारी अजय लहाने यांनी केले आहे.  निवडणूकीत मतदाराने इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राच्या माध्यमातून ज्या उमेदवारास मतदान केले,  त्यालाच आपले मत पडले आहे याची खातरजमा व्हीव्हीपॅट(VVPAT) यंत्रांच्या माध्यमातून होणार आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या विश्वासार्हतेबद्दल कोणतीही शंका राजकीय पक्षांच्या मनात राहू नये म्हणून यासाठी प्रथमस्तरीय तपासणीस उपस्थित राहून ही प्रक्रिया पक्षांच्या जबाबदार प्रतिनिधींनी जागरुकपणे पाहावी, तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नि:पक्षपाती यंत्रणेचे कार्य प्रत्यक्ष पाहून स्वत:ची पूर्ण खात्री करुन घेण्याचे कार्य एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून पार पाडावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नोंदणीकृत पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना करण्यात आले आहे.

यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बॅडमिंटन हॉल येथे सुरु होईल व त्यानंतर सुमारे दहा ते बारा दिवस चालेल. यावेळी राजकीय पक्षांनी आपल्या एका जबाबदार प्रतिनिधीने रोज सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे.  तसे पत्र सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नोंदणीकृत पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना देण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी दिली.