मुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री

अमरावती, प्रजामंच,24/11/2018

मुद्रा बँक योजनेत कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत बँकांकडून नकारात्मक भूमिका घेतली जाते, अशा मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. ही बाब गंभीर असून, जिल्हा अग्रणी बँकेने याबाबत अहवाल द्यावा, तसेच अधिक प्रभावीपणे व लोकाभिमुख काम करावे, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज येथे सांगितले.

मुद्रा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यस्तरीय समितीचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, जिल्हास्तरीय समितीचे सदस्य बादल कुलकर्णी, सोपान गुडधे, सुनील चरडे, हरिष साऊरकर, शरद बंड, विलास राठोड, आशिष राठोड, विनोद कलंत्री, गिरीश शेरेकर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी जितेंद्रकुमार झा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या क्रांती काटोले, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,  जिल्हा रोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके आदी यावेळी उपस्थित होते.

प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री म्हणाल्या की, या योजनेत किती प्रकरणे बँकेस प्राप्त झाली, किती निकाली निघालीत व किती प्रलंबित आहेत, याबाबत बँकनिहाय व शाखानिहाय आकडेवारी जिल्हा अग्रणी बँकेने सादर करावी. मुद्रांतर्गत कर्जवितरण वाढले पाहिजे. त्यासाठी जनजागृती करुन तालुका पातळीवर मेळावे घेण्याचाही निर्णय यावेळी झाला.

मुद्रा लोनविषयी सूर्यवंशी म्हणाले की, योजनेतील राष्ट्रीयीकृत बँकांचे काम समाधानकारक नाही. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत खासगी व लघुकर्ज वितरण करणारया बँकांची कामगिरी चांगली आहे. बँकांकडे कर्ज मागण्यासाठी येणारया नागरिकांची दिशाभूल  होत असल्याच्या तक्रारी आहेत. असे प्रकार घडता कामा नयेत. पात्र माणसांपर्यंत या योजनेचे लाभ पोहोचले पाहिजेत. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत.

पातुरकर म्हणाले की, बँकांनी कर्ज मागण्यासाठी येणारया ग्राहकांना योग्य माहिती देऊन त्यांना कर्ज मिळण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. लघु कर्ज वितरणाबाबत संबंधित यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, असेही ते म्हणाले.

स्थावर तारण कर्जाची प्रकरणे मुद्रा कर्जात रूपांतरित केल्याचेही प्रकार घडले आहेत, अशी तक्रार विविध सदस्यांनी केली. त्याविषयी तपासाचे निर्देश जिल्हाधिकारयांनी दिले. श्रीमती भाकरे यांनी आभार मानले.