वान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती  

अकोट प्रजामंच,22/11/2018

अकोट प्रादेशिक वन विभागात सौंदळा गावाजवळ वान प्रकल्पाचा मुख्य कालवा आहे. या कालव्यात मंगळवारी मध्य रात्री दरम्यान बिबट्या पाण्यात पडल्याची घटना समोर आली असून बिबट्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.यंदा पाउस कमी पडल्याने आता पासूनच मेळघाटातील वन्य प्राणी आपली तहान भागविण्यासाठी भटकंती करत असल्याचा अंदाज नाकारता येत नाही.मेळघाटातील बिबट्या कालव्यात पाणी पिण्यासाठी आला असल्याचा अंदाज लावला जात असून पाण्यात पडल्यावर वरती येता न आल्याने बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे,

या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे यांना मिळताच अकोटचे वनपाल अजय बावणे यांच्या पथकासह घटनास्थळ पोहचले.कालव्याच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून पंचनामा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी अकोट आणि तेल्हारा येथील पशू वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर अकोट वन विभागाच्या विश्राम गृह परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.