दमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार

नदीजोड प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री गडकरींच्या उपस्थितीत बैठक

मुबई,प्रजामंच,22/11/2018

दमणगंगा व तापी नदी या देशातील महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सोबतच रखडलेले ११२ प्रकल्पावर चर्चा झाली. महाराष्ट्राचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन बैठकीला आवर्जून उपस्थित होते. दमनगंगा व तापी या दोन्ही नदीचे समुद्रात वाहून जाणारे पाणी खान्देश आणि मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

दमणगंगा, तापी या दोन्ही नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारे पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होत आहे. पावसाचे  वाया जाणारे पाणी, या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतीसाठीही उपयोग होईल. बैठकीत बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याला नाबार्डकडून मिळणाऱ्या कर्जमदतीवर या वेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्प आणि बळीराजा जलसंजीवनी योजना यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याचे  बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

अपूर्ण सिंचन प्रकल्पही पूर्ण करणार
बळीराजा जलसंजीवनी योजनेवर चर्चा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा उद्देश ठेवून  अवर्षणप्रवण भागातील एकूण ११२  रखडलेले प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असून  त्यामुळे प्रकल्पांच्या भागातील शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली येणार आहे.