गोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शाळांनी यशस्वीपणे राबवावी,अन्यथा कठोर कार्यावाही –  प्र.जिल्हाधिकारी मनीषा खत्री

सार्वजनिक आरोग्य संवर्धनात अडथळा आणणा-यांवर कठोर कारवाई

अमरावती, प्रजामंच,21/11/2018

गोवर रुबेला मोहिम प्रथम टप्प्यात शाळांतून राबविण्यात येणार असल्याने सर्व शाळांनी मोहिमेच्या संपूर्ण यशस्वितेसाठी सर्वंकष प्रयत्न करावे, तसेच पालकांनीही सहकार्य करावे. या मोहिमेला विरोध करुन किंवा चुकीची माहिती पसरवून सार्वजनिक आरोग्य संवर्धनात अडथळा आणणा-यांवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 133 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील 15 वर्षे वयापर्यंतच्या सर्व बालकांच्या गोवर- रुबेला लसीकरणासाठी पाच आठवड्यांची मोहिम दि.27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्याबाबत विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, शाळाप्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. रेवती साबळे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अमेय धात्रक, डॉ. मानसी मुरके, सांख्यिकी अधिकारी ए. के. कंटाळे, आयुष अधिकारी पल्लवी आगरकर, ‘जमियत ए उलमा ए हिंद’चे जिल्हाध्यक्ष हाफिज नाजिमुद्दीन अन्सारी, मौलाना मुश्ताक अशरफी, मौली अब्दुल्लासाहेब आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात मोहिमेच्या यशस्वितेसाठी सर्व शाळा, संस्था, पालक, नागरिकांचा सहभाग मिळविण्यात येत आहे. सर्व शाळांना सूचना व माहिती देण्यात आली आहे.  तथापि, चुकीची माहिती पसरवणे, लसीकरणाच्या कामाला नकार देणे अशा घटना घडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्याच्या संवर्धनासाठी ही अत्यंत महत्वाची मोहिम आहे. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पालकांसह सर्व घटकांनी याची दखल घेऊन मोहिम यशस्वी करावी.

राज्यात 3 कोटी 82 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होईल. ही मोहिम सुरुवातीच्या दोन आठवड्यांत शाळांतून चालेल. पुढे शाळाबाह्य मुलांचेही लसीकरण होईल. मोहिमेसाठी सभा, बैठका, विविध स्पर्धांचे आयोजन याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, असे डॉ. आसोले म्हणाले.

‘जमियत ए उलमा ए हिंद’तर्फे अल्पसंख्याकबहुल परिसरातील सर्व शाळांना मोहिमेत सक्रिय सहभागाबाबत पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.मशिदींतूनही मोहिमेबाबत जनजागृती केली जाईल, असे हाफिज अन्सारी यांनी सांगितले.

  माझ्या मुलाचे लसीकरण करणार,  खत्री यांचे आवाहन

मी स्वत: माझ्या मुलाचे सर्वप्रथम लसीकरण करुन घेणार. जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करुन घ्यावे व या सार्वजनिक आरोग्य संवर्धनाच्या कार्यास सहभाग द्यावा, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.