अमरावती येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 इमारतीचे चे लोकार्पण सोहळा संपन्न  

अमरावती प्रजामंच,19/11/2018

एकात्मिक आदिवासी प्रकल्पातर्फे नवसारी येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र.3 च्या नूतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.खासदार आनंदराव अडसूळ, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, विजयराज शिंदे, प्रकल्प अधिकारी राहूल कर्डिले आदी उपस्थित होते.  प्रारंभी थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले,

पालकमंत्री पोटे पाटील यावेळी म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून  समाजातील वंचित घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य केले. वंचित समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवून अधिकारी व्हावे. स्वत:ची प्रगती घडवून आणत असताना समाजासाठीही योगदान द्यावे. आपल्या घटनादत्त अधिकारांचे संरक्षण करत समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

शासनाने आदिवासी विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे खासदार अडसूळ यांनी सांगितले. विद्यार्थिनी वसतिगृहासाठी इमारत होणे आवश्यक होते.मुलांच्या वसतिगृहासाठी इमारत करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे मेलाघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी सांगितले.

वसतिगृहाची सुसज्ज इमारत

वसतिगृहाची इमारत जी प्लस थ्री असून, विद्यार्थिनी निवास क्षमता 180 आहे. एकूण 3 कोटी 68 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या इमारतीत किचन, डायनिंग, पँट्री भांडार, कार्यालय, अधिक्षक निवासस्थान व सिक रुम अशी रचना आहे. पहिल्या व तिस-या मजल्यावर 10 खोल्या व एक अभ्यासिका आहे. एका खोलीत सहा विद्यार्थिनी राहू शकतात. अंदाजपत्रकात काँक्रिट रस्ता, सुरक्षारक्षक केबिन, अभ्यागत कक्ष, स्वच्छतागृह, वाहनतळ आदी अंतर्भूत आहे. दुस-या टप्प्यात 360 विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी अप्पर आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.  गुल्लरघाट येथील मुख्याध्यापक जवाहर गाढवे यांनी सूत्रसंचालन केले.