आर्थिक अडचणीमुळे गरिब पिडीतांनी न्यायापासून वंचित राहू नये त्यासाठीच विधीसेवा समिती – न्यायाधीश मुकुल गाडे

धारणी प्रजामंच,18/9/11/2018 

दिवसेंदिवस न्याय मागण्यासाठी खर्चात वाढ होत असल्यामुळे गरीब पीडितांना न्याय मागण्यासाठी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते, म्हणून अनेक गरजू आणि पिडीत गोरगरीब न्यायालयापर्यंत न्याय मागणीसाठी पोहोचू शकत नाही,अशा गरिबांसाठी न्यायालयाने विधीसेवा समिती मार्फत मोफत वकील उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे आपणाकडून अपेक्षा करण्यात येते की दारिद्र रेषेखालील तसेच अल्प उत्पन्न धारक अशा लोकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा दाद मागण्यासाठी तालुका विधी सेवा समितीकडे रीतसर मागणी करावी,मोफत वकिलाची व्यवस्था असून न्याय देण्याचे कार्य विधी सेवा समिती करण्यासाठी तत्पर आहे , असे प्रतिपादन धारणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश मुकुल गाडे यांनी केले.धारणी येथील न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकन्यायालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना ऐड. सत्यदेव गुप्ता यांनी मोफत कायदेविषयक माहिती सोबत मध्यस्थी केंद्राच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच सहायक सरकारी वकील भारत भगत यांनी महिलांना गरोदर असताना शासनाकडून मिळणाऱ्या योजना व इतर कायदेविषयक माहिती दिली. एडवोकेट सुभास मनवर यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाद मागतांना अमलात येत असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 154 बाबत विस्तृत माहिती दिली.
यावेळी मोठ्या संख्येने अशील वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कृष्णा मालवीय यांनी केली या कार्यक्रमानंतर न्यायाधीश व वकील मंडळी बिजुधावडी गावाला फिरते पथक वाहनाच्या माध्यमाने न्याय आपल्या दारी योजनेच्या अनुषंगाने भेटी दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना न्यायालयात दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती पुस्तिका वाटप केले. तसेच कायद्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. राज्य विधी सेवा समिती मार्फत आयोजित तालुका विधी सेवा अंतर्गत दिनांक 16 ते 24 नोवेंबर दरम्यान विधी सेवा सप्ताह सुरू आहे या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघामार्फत गावोगावी याबाबत प्रचार प्रसार करण्यात येत आहे.