मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक,शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष

मोर्शी प्रजामंच रुपेश वाळके,30/102018

मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जीर्ण झाल्याची अनेक ठिकाणी चित्र बघायला मिळते,यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिकस्त इमारतींकडे शासन-प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचा सूर पालकांकडून ऐकण्यास मिळत आहे,   मोर्शी तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारातूनच विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहेत.

कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. शिक्षणाचा दर्जा सुधारावा विद्यार्थ्यांना सर्व सोई सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात, परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे मात्र शिक्षणाचा खेळखंडोबा होतो, तर कुठे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला जातो. मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा या उदासीन धोरणाचे बोलके उदाहरण आहे.

दापोरी येथे १८७९ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेने १३९ वर्ष पूर्ण केली आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत सात शिक्षक असून मुख्याध्यापक पद सुद्धा रिक्त आहे , १९४ पटसंख्या आहे. ही इमारत शिकस्त झाली असून, जागोजागी तिचे प्लास्टर उखडलेले आहे. कवेलू पडत आहेत. इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत. अशा इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण घेणे चालू आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला निर्माण होणारा धोका निर्माण झाला आहे . मोर्शी तालुक्यातील काही शाळांना जवळपास शंभर वर्षे झाली असून जुनी इमारत ज्या अवस्थेत होती, तीच अवस्था आजही कायम आहे. त्या वर्ग खोल्याची दुरुस्ती केली नाही आणि शिकस्त असलेल्या वर्गखोल्या अद्यापही पाडण्यात आलेल्या नाही. या इमारती विद्यार्थी शिक्षकांसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत . काही शाळांमधील इमारती कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आल्या आहे. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत अहवाल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांनी पंचायत समिती अंतर्गत विविध शाळांमधून आलेल्या प्रस्तावानुसार शिकस्त वर्गखोल्या पाडणे , मेजर दुरुस्ती करणे , नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम करणे , याकरिता शिक्षणाधिकारी यांच्याकडे १८ जून २०१७ रोजी दापोरी , उमरखेड , निंभी , लाखारा , गोराळा , अंबाडा , डोंगर यावली , राजूरवाडी , भाईपुर , रिद्धपुर , बुऱ्हाणपूर , हिवरखेड , भांबोरा , पोरगव्हान , कवठाळ , पिंपळखुटा मोठा , सीम्भोरा , तळेगाव , दुर्गवाडा , तळणी , आडगाव , बोन्डना , मायवाडी , या शाळांची मेजर दुरुस्ती करणे व शिकस्त वर्ग खोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याची मागणी करणारा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे तरी सुद्धा मोर्शी तालुक्यातील शाळांची साधी पाहणी सुद्धा करण्यात आली नाही या प्रकाराबाबत संबंधीत मुख्याध्यापकांनी वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्यांची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. या गंभीर बाबीमुळे विद्यार्थी, शिक्षक पालक नेहमीच दडपणाखाली असतात. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होऊन विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहतेय का? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. बरेच वर्षांपासून शिकस्त झालेल्या मोर्शी तालुक्यातील शाळेच्या इमारती मेजर दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याकरिता पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला वारंवार प्रस्ताव देण्यात आले आहे , परंतु त्याचा अद्यापही उपयोग झाला नसून, प्रस्ताव धूळखात पडले असल्यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होतांना दिसत आहे .

शाळेने प्रस्ताव पाठवला पण निधी कधी उपलब्ध होणार ?

दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या ५ वर्गखोल्या शिकस्त झाल्या असून त्या पडून नवीन ५ वर्गखोल्या बांधकाम करण्याकरिता जिल्हा परिषदकडे अनेक वेळा पत्र पाठवून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सादर केले.नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याकरिता जागेची कुठलीही अडचण नाही, मात्र त्यावर शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसून प्रशासकीय यंत्रणेकडूनच याची दखल घेतल्या जात नाही , त्यामुळे येथील शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना भिंतीला तडे गेलेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे हे विशेष !

संपूर्ण