बिजुधावडी आश्रम शाळेत तब्बल नऊ वर्षापासून ११ वी १२ वीला गणित शिक्षकाचे पद मंजूर नाही,आदिवासी विभाग जागे व्हा -राजकुमार पटेल 

धारणी, प्रजामंच19/10/2018 

मेळघाटात आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कोट्यावधी रुपये आदिवासींच्या विकासासाठी खर्चीला जात असला तरी मेळघाटात आदिवासी समाज शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात उच्चांक गाठू शकले नाही. अनेक दशके उलटलेत असे असतांना आदिवासींची शैक्षणिक प्रगती अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याची नाराजी दिसून येते, मेळघाटात आदिवासींची शैक्षणिक प्रगती व्हावे यासाठी अनेक ठिकाणी शासकीय आश्रम शाळा उघडण्यात आलेले आहेत मात्र या आश्रमशाळेवर विद्यार्थ्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा शिक्षणासाठी आवश्यक बाबी यांचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचे दिसून येते, असे असताना देखील शासकीय आश्रम शाळांचा दहावी व बारावीचा निकाल हा 80% पेक्षा वर लागतो तरी कसा हा मंथनीय प्रश्न आहे. यामुळे शासनस्तरावरून आदिवासींचा शैक्षणिक विकास होतोय की त्यांची फसवणूक असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो, शासनाने लादलेल्या जाचक अटी व शर्ती सुद्धा दर्जेदार शिक्षणाला अडथळा निर्माण करत असल्याचे चित्र आहे. दहावी व बारावीच्या निकालाची उत्तीर्ण विद्यार्थ्याची टक्केवारी ही अट सर्वाधिक दर्जेदार शिक्षणाला अडसर ठरत असल्याचे मत ऐकण्यास मिळते, आदिवासींचा विकास कागदावर दाखवल्या जात असे लक्षात येते.

धारणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजुधावडी शासकीय आश्रम शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत ३९१ मुले व ३८८ मुली असे एकूण ७७९ विद्यार्थी शिक्षण घेतात या सर्वाधिक मोठी पटसंख्या असलेल्या बिजुधावडी आश्रम शाळेत २००८ पासून कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय उघडण्यात आले आहे, २००८ पासून उघडण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेसाठी  अद्यापही गणित विषयाच्या शिक्षकाचे पद मंजूर नसल्याचे समोर आले असून आदिवासी विभागाचे आश्रम शाळेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याचे दिसून येते, तब्बल नऊ वर्षे उलटूनही विज्ञान शाखेत गणित विषय असताना गणित शिक्षकाचे पद मंजूर नसणे यावरून प्रकल्प कार्यालयात किती सजग आहेत याचा दाखला मिळतो.

राहण्याची व्यवस्था दुरवस्था

बिजुधावडी आश्रम शाळेत निवासी मुलांमुलींची संख्या मोठी असताना राहण्याची व्यवस्था पाहिजे तशी नाही यामुळे अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावा लागतोय,निवास व शिक्षण एकाच ठिकाणी असून इमारतीची दुरावस्था आहे, मुलांची पटसंख्या अधिक असून वर्गखोल्या छोट्या पडत आहे यामुळे मुलांना अनेक समस्यांशी तोंड द्यावे लागत आहे. याविषयी येथील प्राचार्य सुरेश पटेल यांना विचारले असता याविषयी आपण वरिष्ठांना माहिती देवून पाठपुरावा करीत असल्याची माहिती दिली तर गणित शिक्षकाचे पद मागील ९ वर्षापासून मंजूर नसल्याचे सांगितले याबाबत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी यांच्याशी पत्र व्यवहार करण्यात आल्याचे सांगितले

माजी आमदार आता मेळघाटच्या आश्रम शाळा विरोधात आंदोलन उभारावे लागेल.

माजी आमदार राजकुमार पटेल यांनी बिजुधावडी शासकीय आश्रम शाळा येथील दुरवस्था बघितले असता खेद व्यक्त करत सांगितले की, जोपर्यंत आश्रमशाळेत सर्व सुविधा नियमित होत नाही तोपर्यंत आश्रम शाळा सुरूच करायला नको, मात्र आदिवासी विभाग आश्रम शाळा उघडल्याची घोषणा करतात आणि त्यानंतर हळूहळू मूलभूत सुविधा देण्यास सुरुवात करते ही अतिशय उलट परिस्थिती आहे, या पद्धतीने आदिवासीचे विकास होणे अशक्य आहे शासन आदिवासींच्या जीवनाशी खेळ करत असून यामुळे शैक्षणिक विकास होण्यापेक्षा त्यांचा नुकसानच होत आहे त्यामुळे शासनाला आदिवासींचे विकास करायचे असेल तर गांभिर्याने घेवून मेळघाटातील आदिवासी आश्रम शाळांसाठी आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अन्यथा एक दिवस यासाठी सुद्धा आंदोलन उभारावे लागेल अशा प्रखर शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

संपूर्ण