नियमाप्रमाणे मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे- एकनाथ खडसे

जळगाव,प्रजामंच,5/8/2018

पक्षातील ज्येष्ठत्वाचा दृष्टीने मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार इच्छा व्यक्त करत पुर्नउच्चार केला. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलले.

जळगाव पालिका निवडणुकीत खडसे आणि महाजन गट असल्याचं दाखविलं जातं.मात्र असे कोणतेही गट-तट नाही असे सांगत सर्वांचा मीच नेता आहे असे खडसेंनी यावेळी सांगितले. जळगाव महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर खडसे यांनी मनातील खदखद मोकळी केली आणि पक्षाला राज्यापासून जळगावला सत्तेत आणण्यासाठी आपले योगदान असून शिवसेना- भाजप युती आपणच तोडल्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला.

जळगाव महापालिका निकालावर बोलतांना, मी चाळीस वर्षांपासून भाजपचे काम करीत आहे. त्यातील तीस वर्षे जळगावला भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष केला. स्वत:ला श्रेय मिळावे म्हणून कधी लढा दिला नाही. अन्याय, भ्रष्टाचारावर प्रहार केले. कुणीतरी श्रेय घेण्यापेक्षा जनतेला सर्व काही माहित आहे. नाथाभाऊंबद्दल जनतेच्या मनात इतका आदर आहे की श्रेय दिलं काय आणि नाही दिले काय काही एक फरक पडत नाही. ज्याला श्रेय मिळत नाही त्यांना श्रेय द्या. जळगाव महापालिकेतील भाजपचा विजय हा सर्वांचा विजय आहे याचे श्रेय घेणाऱ्यांना शुभेच्छा असंही खडसेंनी म्हटलं. जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून मीच कार्यकर्ते घडवले आणि मोठे केले. त्यांना संधी दिली. माझ्या मनात श्रेयवादाची भावना कधी निर्माण झाली नाही आणि होणार नाही. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी युती केली असती तर निकालानंतर हा युतीचा विजय आहे असं म्हटलं असते. मीच पक्षाला एकटे लढवण्यासाठी भाग पाडले आणि त्यामुळे भाजपचा विजय झाला. निवडणुकीत उभे असलेले सर्वच्या सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचे आहे असंही ते म्हणाले.

नाथाभाऊ, नाथाभाऊ आहे. पक्षात कुठलीही घुसमट नाही. कोणी सोबत नसताना मी एकट्याने जळगावला जागा लढविल्या होत्या. प्रतिकुल परिस्थितीत मी एकट्याने डॉ.के.डी. पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले, त्यानंतर विरोधात असताना 34 नगरसेवक निवडुन आणले ते एकट्याच्या बळावर असंही खडसेंनी सांगितलं.

माझ्या आवाजाची क्‍लीप महापालिका निवडणुकीत व्हायरल केली म्हणजेच माझी गरज आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रात मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली म्हणून भाजपला यश मिळाले. गिरीश महाजन काय नि नाथाभाऊ काय, पक्षात ज्येष्ठत्व नाकारले जात नाही हेच शेवटी खरे आहे असंही खडसेंनी आवर्जून सांगितलं.

संपूर्ण