भाजप देतेय आमदारांना १०० कोटींची ऑफर – कुमारस्वामी

बेंगळूरु, प्रजामंच,16/5/2018 

कर्नाटकात भाजपनं आमदारांना गळाला लावण्यासाठी घोडेबाजार सुरू केला आहे. त्यांना फोडण्यासाठी भाजपनं प्रत्येक आमदारांना १०० कोटी रुपये आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप जेडीएसचे नेते  कुमारस्वामी  यांनी केला आहे. त्यामुळे कर्नाटकात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
कर्नाटकात सत्तेची रस्सीखेच सुरू झालेली असतानाच कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा जाहीर आरोप केला. जेडीएसच्या चार ते पाच आमदारांना भाजपनं प्रत्येकी १०० कोटी रुपये आणि कॅबिनेट मंत्रीपद देण्याची ऑफर दिली आहे. मात्र या आमदारांनी भाजपची ऑफर धुडकावून लावल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं.’भाजपनं २००८ मध्ये अवलंबिलेलं आमदार फोडीचं ‘ऑपरेशन लोटस’ यावेळी सुरू करू नये. नाही तर भाजपला ते महागात पडेल. भाजपने जर आमचे १० आमदार फोडले तर आम्ही त्यांचे २० आमदार फोडू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर आघाडी करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून ऑफर आली होती. मात्र आम्ही काँग्रेसची ऑफर स्वीकारली. २००६ मध्ये भाजपसोबत जाऊन मोठी चुकी केली होती. त्यामुळे माझ्या वडिलांच्या राजकीय चारित्र्यावर डाग लागला होता. आता देवानं मला ही चूक सुधारण्याची संधी दिली आहे. त्यामुळेच आम्ही काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘भाजपनं जनतेला १५ लाख रुपये देण्याचं लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिलं होतं.हे आश्वासन पाळण्यासाठी भाजपकडे पैसे नाहीत. पण आमदारांच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे आहेत,’ असा टोलाही कुमारस्वामी यांनी लगावला. राज्यपालांनी घोडेबाजार रोखण्यासाठी योग्य तोच निर्णय घ्यावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांच्याशी तुमची भेट झाली का? असा सवाल कुमारस्वामी यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ‘कोण प्रकाश जावडेकर?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. भाजपच्या कर्नाटकातील विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात नसून मोदी यांनीच त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही त्यांनी केला.

संपूर्ण