महसूल विभागाचा वरून कीर्तन खालून तमाशा

माझे ही मत

शासनाच्या लोकहिताच्या दृष्टीने राबविण्यात येणारे उपक्रम खऱ्या अर्थाने किती जबाबदारीने राबविले जातात, याचे  खरे परीक्षण केले तर आश्चर्याचा धक्का देणाऱ्या गोष्टी समोर येतील खरे बघितले तर मानव आणि सजीव हिताच्या दृष्टीने भविष्याचा विचार कुणीही गंभीरतेने करत नसल्याने आजे पाण्यासारख्या अत्यंत जीवनावश्यक वस्तू साठी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे आपल्या समोर आहे, अनेक ठिकाणी पाण्यासाठी भांडण होत असल्याच्या घटना घडत आहे. तर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे असे असतांना ही या साठी कारण्यात येणाऱ्या उपयोजना मात्र जाहिरातीच्या स्पर्धेत मर्यादित राहून आहे. हीच मोठी विडंबना आहे. अनेक क्षेत्र ड्रायझोनमध्ये मोडताना दिसत आहे पण होणाऱ्या उपयोजना ह्या नाममात्र दिसून येतात.

वरुड तालुक्याला ड्रायझोनचा लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न चालविले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून अमीर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत नागरिक उन्हातान्हात पाण्यासाठी घाम गाळत आहे. महसूल विभागासह सेवाभावी संस्था श्रमदानात सहभागी होत असतांना तालुक्यात अवैध बोअर व ब्लास्टिंग होत असताना मात्र महसूल विभागाने या अवैध कामाकडे अलगदपणे पाठ फिरविल्याने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा उपक्रम हा एक देखावा झाला असून महसूल विभागाचा वरून कीर्तन अन खालून तमाशा असाच  प्रकार सुरू असल्याचे दिसते. वरुड तालुक्याला संत्र्यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाते.संत्र्याने या भागाला वैभव मिळवून दिले. परंतु पाण्याच्या अतिउपशामुळे पातळी खोल गेली तशी सर्वच शेतकऱ्यांची विहिरी खोल करणे, हजार फुटांच्या वर बोअर मारणे अशी स्पर्धा सुरू झाली. अखेर भूगर्भातील पाणीच नाहिशे झाले.मात्र पाण्याची पातळी कायम राहावी म्हणून कोणतीच काळजी घेण्यात आली नाही, आता ड्रायझोनचा कलंक हटविण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असताना अवैध बोअरवेल व ब्लास्टिंग वर प्रतिबंध लावणे अपेक्षित असताना ते होत नसल्याने पाण्याची पातळी सामान्य स्तरावर कशी येणार असा सवाल उपस्थित होतो,

पोटच्या गोळ्याप्रमाणे जोपासलेल्या संत्राबागांचे पाण्याअभावी सांगाळे झाले. अनेक संत्रा भागावर कुऱ्हाड चालविताना शेतकरी हवालदिल झाला. ड्रायझोन चा कलंक या तालुक्याला लागला. या नियमावली ठरवून देण्यात आली. विहीर खोदने, बोअरवेल, यावर शासनाने बंदी आणली. उल्लंघन केल्यास गुन्ह्याची तरतूद सुद्धा करण्यात आली. ड्रायझोनचा हा डाग पुसून टाकण्यासाठी नाला खोलीकरण, शेततळे, जलशिवार योजनेची कामे, बंधारे बांधणे इत्यादी कामे  शासन स्तरावरून राबविणे सुरु आहे. गेल्या दोन वर्षापासून तालुक्यात वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेत आहे. जिल्हाधिकारी, महसूल विभाग, कृषी विभाग सर्वच विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, समाजसेवी संस्था श्रमदान यांची श्रमदान केल्याची वृत्ते सतत प्रसार माध्यमात झळकत आहे, मग सर्व फक्त प्रसिद्धीची जाहिरीत तर नाही ना ? प्रश्न पडतो, तालुक्यात सुरु असलेले अवैध बोअरवेल व ब्लास्टिंग याला महसूल विभागाची मूकसंमती असल्याची चर्चा नागरिक करताना दिसतात  .
परिस्थिती बिकट होत असून पाणी टंचाईने जनता होरपडलेली आहे. कुठे आठवड्यातून एकदाच तेही मोजकेच पाणी मिळत आहे. गुराढोरांचा पाण्याचा प्रश्न आवर्जून उभा आहे. पाण्याचे स्रोत उचकीवर आले आहे. विहिरीतून घोट घोट पाणी काढून संत्राची झाडे जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्याकडून केल्या जात आहे. पाण्याच्या अति वापरावर निर्बंध लावणे, पर्यावरण पूरक उपक्रम राबवितांना काळजी घेणे अपेक्षित आहे. पावसाचे पाणी जमिनीत  मुरविणारे उपक्रम बेपत्ता झाल्याचे दिसते, या सर्व गोष्टीसाठी जनजागृती करणे आवश्यक झाले आहे. प्रशासन जोपर्यंत कडक धोरण अवलंबणार नाही तोपर्यंत शक्य नाही,शासनाने ठरवून दिलेले नियम राबविणाऱ्याकडून पायदळी तुळविल्या जात असेल ड्रायझोनच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीचा हा प्रयत्न संबंधीतांकडून दिखावा ठरू शकतो.

                                                                  प्रभाकर लायदे,वरुड  तालुका प्रतिनिधी 

 मो. ७७७००३२००१ 

संपूर्ण