विदर्भवाद्यांवर लाठीचार्ज, एक जखमी, आंदोलकर्त्यांना अटक

झेंडा फडकविण्यास द्रोण विमानाचा वापर

नागपूर, प्रजामंच,1/5/2018   

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात एक युवक जखमी झाला तर शेकडो आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यात अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. नंदा पराते आदींचा समावेश होता.

विदर्भवादी संघटना महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळतात. त्याअनुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात चौदा विदर्भवादी संघटनानी  नागपुरात भव्य मोचा काढला. यशवंत स्टेडीयम येथून दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान मोर्चाला प्रारंभ झाला. विदर्भवादी नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे वरिष्ठ सदस्य व अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, निमंत्रक राम नेवले, प्रबीर चक्रवर्ती, नागपूर जिल्हा अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते, पश्चिम विदर्भ महिला आघाडीच्या रंजना मामर्डे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, शहराध्यक्ष राजू नागुलवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.

जय विदर्भचे फलक घेतलेले कार्यकर्ते घोषणा देत बँक ऑफ महाराष्ट्र मार्गे झाशी राणी चौक, सीताबर्डी मेन रोड, लोखंडी पूल, टेकडी गणेश ओव्हरब्रीज, जयस्तंभ चौक मार्गे परवाना भवन चौक येथे पोहोचले. कस्तुरचंद पार्क समोर कार्यकर्त्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला. विधानभवनावर झेंडा फडकवण्याचे विदर्भवादी नेत्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. कार्यकर्त्यांनी बॅरिकेट बाजुला सारून विधानभवनाकडे आगेकुच करण्याचा प्रयत्न असता पोलिसांनी बळाचा वापर त्यांना तेथेच थांबवले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांचा बळाचा वापर केला आणि लाठीचार्ज केला. त्यात रवी वानखेडे नावाचा युवक जखमी झाला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नंतर अटकसत्र सुरू केले. त्यात त्यांनी अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. नंदा पराते, प्रबीर चक्रवर्ती, अरुण केदार, अ‍ॅड. नंदा पराते, रंजना मामर्डे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, शहराध्यक्ष राजू नागुलवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली.

त्यांच्यात नाही बळ

पोलिसांचा आणि राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो. वेगळा विदर्भ देण्याचे मोदी, गडकरी आणि फडणवीस यांच्यात नाही बळ, आता सर्व सोडून पळ, असअ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले. एक कार्यकर्ता या आंदोलनात जखमी झालेला आहे. आम्ही मानवाधिकार आयोगाला कळवू. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

युवा नेतृत्व जखमी

मोर्चात जखमी झालेल्या युवकाचे नाव रवी वानखेडे असे होते. आम्ही शांतपणे आंदोलन करीत होतो. पण पोलिसांनीच बळजबरी केली आणि माझ्यावर हल्ला केला, असे रवी वानखेडे यावेळी म्हणाला.

अखेर झेंडा फडकला

विदर्भवादी आंदोलक विधानभवनावर झेंडा फडकवण्यासाठीच रस्त्यावर उतरले होते. पण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे झेंडा फडकवणे कठीण होवून बसले होते. अखेर काही युवा कार्यकर्त्यांनी एक शक्कल लढवली आणि द्रोण विमानाच्या माध्यमातून विधानभवन परिसरातील एका झाडावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला.

संपूर्ण