६ वर्षीय बालकाची हत्या करून मांस खाणाऱ्या आरोपीस फाशी

पिलीभीत प्रजामंच,11/4/2018,

उत्तर प्रदेश राज्यातील एका सहा वर्षीय निरागस चिमुरड्याची हत्या करून त्याचे मांस खाणाऱ्या नरभक्षकाला जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीच्या शिक्षेसह २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अवघ्या वर्षभरातच न्यायालयानं निकाल सुनावल्यानं स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

अमरिया येथील कुरेशीयन परिसरात गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. आरोपी नजीम मियाँने त्याच्या शेजारीच राहणाऱ्या सहा वर्षीय मोनीस कुरेशीचं अपहरण केलं. मोनीसचं अपहरण केल्यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून नजीमने त्याचे तुकडे तुकडे केले. धक्कादायक म्हणजे, हे तुकडे त्याने खाल्ले. इतकंच नाही तर तो त्याचं रक्तही प्यायला होता. बराच वेळ होऊनही मोनीस दिसत नसल्याचं लक्षात आल्यानं त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा कुणीतरी त्यांना मोनीसला नजीमच्या घरी जाताना पाहिल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं मोनीसचे कुटुंबीय पोलिसांच्या मदतीने नजीमच्या घरी पोहोचले असता हे धक्कादायक हत्याकांड उजेडात आलं. पोलिसांनी नजीमला मांस खाताना आणि रक्त पिताना रंगेहाथ पकडलं होतं. प्रथमदर्शनी मोनीसच्या हत्येमागचं नेमकं कारण पोलिसांना समजलं नव्हतं. मात्र, नजीम अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळं त्यानं ही हत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.
न्यायाधीश संजीव शुक्ला यांनी या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नजीमला दोषी ठरवत कलम ३०२ अंतर्गत मृत्यूदंड आणि ३७७ अंतर्गत दहा वर्षांची शिक्षा तसंच पॉक्सो अॅक्ट अंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेसोबत २५ हजारांचा दंड ठोठावला.

दरम्यान, ‘पोलिसांनी न्यायालयात अत्यंत महत्त्वाचे पुरावे सादर केले. आरोपीने मुलाच्या शरीराचे तुकडे करून ते खाल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. मोनीसच्या शवविच्छेदन अहवालातही त्याच्या शरीरातील अनेक भाग आढळले नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मी अनेक वर्षापासून वकील म्हणून प्रॅक्टिस करतोय, पण अशी केस कधीच पाहिली नव्हती,’ असं कुरेशी कुटुंबीयांचे वकील अॅड. हेमंत मिश्रा यांनी सांगितलं.