अल्जेरियात लष्करी विमान कोसळले, २०० जणांच्या मृत्यूची आशंका

अल्जिअर्स,11/4/2018

अल्जेरियातील बूफारिक लष्करी तळाजवळ एक मोठे विमान कोसळले आहे. राजधानीजवळ बुधवारी झालेल्या या अपघातात 200 जणांच्या मृत्यूची भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक माध्यम आणि बचाव पथकांसह बघ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली आहे. सोबतच, सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये आग आणि धूर दिसून येत आहे. विमानाचा एक पंख चक्क झाडावर अडकल्याचे फोटो सुद्धा काहींनी ट्विटर पोस्ट केले आहेत.

घटनास्थळावर बचाव पथकाच्या हेलिकॉप्टरसह 14 रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत.विमानाचे अवशेष उचलण्याचे काम सुरू आहे. या विमानात सैनिक आणि लष्करी स्टाफ असा जवळपास 200 जणांचा समूह होता. त्यापैकी कुणीही वाचले नाहीत असे सांगितले जात आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अपघाताच्या कारणांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, 4 वर्षांपूर्वी याच ठिकाणी लष्कराचे विमान कोसळून 77 जणांचा मृत्यू झाला होता.