भाजप आमदार पारवे यांची पोलीस उपनिरिक्षकाला मारहाण 

नागपूर प्रजामंच 6/3/2018 

उमरेडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर पारवे यांनी रविवारी रात्री  सहायक पोलीस उपनिरिक्षकाला मारहाण  केल्याने खळबळ उडाली आहे.  विशेष म्हणजे, पारवे यांना मारहाण प्रकरणात भिवापूर न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती व यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व संकटात सापडले होते हे येथे उल्लेखनीय.

या घटनेसंदर्भात संबंधित पोलीस अधिकारी आणि आमदार यांनी परस्परांच्या विरोधात उमरेड पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या. मात्र, या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

सदर पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक अनिल गर्जे रविवारी पत्नीसह त्यांच्या कारने गिरड येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना मांगरुड मार्गावर त्यांची कार पंक्चर झाली. चाक दुरस्तीसाठी ते घेऊन जात असताना त्याच मार्गाने रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गाने सुधीर पारवे नागपूरला कारने येत होते. गर्जे यांच्या गाडीचे चाक पारवे यांच्या गाडीवर येऊन धडकले.

त्यामुळे  पारवे आणि त्यांचे स्वीय सचिव संतप्त झाले. यातून गर्जे आणि पारवे यांच्यात वाद झाला. अनिल गर्जे यांनी सुरुवातीला पारवे यांच्या कार्यकर्त्यांला आणि स्वीय सहायकाला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या पारवे यांनी शिवीगाळ करत गर्जे यांना मारहाण केली. यात पोलिसाचे कपडे फाटले. लगेच अनिल गर्जे आणि कुटुंबीयांनी उमरेड पोलीस ठाणे गाठले आणि पारवे यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल  केली. त्यानंतर पारवे यांच्या स्वीय सहायकाने गर्जे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पारवे यांनी मारहाण करण्याची पहिली घटना नाही. यापूर्वी त्यांनी एका शिक्षकाला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता पोलीस मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे पारवे यांच्यावर गुन्हा दाखल करून काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

        उमरेडवरून माझ्या गाडीने येत असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीचे चाक पंक्चर झाले. ते चाक  दुरुस्तीला नेत असताना माझ्या गाडीवर येऊन धडकले. त्यामुळे माझी गाडी डगमगली. गाडी थांबवली आणि कोणाच्या गाडीचे चाक आहे म्हणून बाहेर आलो तर पोलीस अधिकारी गर्जे गाडीतून बाहेर आले. त्यांच्यावर संतापलो आणि मी समोर निघून जात असताना माझी गाडी पंक्चर झाली. त्यामुळे थांबलो तर ते माझ्या अंगावर धावून आले आणि त्यांनी स्वत: शर्ट फाडला आणि शिवगाळ सुरू केली. माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजावले. मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी कुणालाही मारहाण केली नाही. या प्रकरणात गुंतवले जात आहे. कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

सुधीर पारवे, भाजप आमदार

 

संपूर्ण