राज्याला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचा आज 29 वा स्मृतिदिन

मुंबई 1/3/2018 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचा आज 29 वा (1 मार्च 1989) स्मृतिदिन आहे. राज्याला प्रगतीकडे नेणारा मुख्यमंत्री अशी वसंतदादांची ओळख आहे. सहकार, शेती, शिक्षण, औद्योगिक प्रगत महाराष्ट्राचे शिल्पकार राहिलेले वसंतदादा ख-या अर्थाने युग प्रवर्तक होते.1977 ते 1985 या कालखंडात दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा जनतेच्या मनातील ख-या अर्थाने ‘दादा’ होते. दादांनी आपल्या काळात महाराष्ट्राला एक संस्थात्मक राज्य बनविले. सहकार क्षेत्रात आज महाराष्ट्र जो काही त्यांत वसंतदादांचे मोठे योगदान आहे.

पाणी आडवा पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच दिला. दादांचे शिक्षण कमी होते पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षणसंस्था काढण्याचा मार्ग त्यांनीच दाखवला. त्याचमुळे महाराष्ट्र आज शिक्षण, सहकार, शेती क्षेत्रात अग्रेसर आहे. सहकार, शेती, शिक्षण क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी सांगली.

वसंतदादांचा जन्म सांगलीतील मिरज तालुक्यातील पद्माळे या गावात 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. वसंतदादा पाटील हे सर्वसामान्य जनतेला आपले नेते वाटायचे. शेतकरी वर्गातून पुढे आलेल्या दादांना सत्तेचा दर्प कधीच चढला नाही. ते सर्वांशीच प्रेमाने व आपुलकीने वागत समोरच्यावर विश्वास टाकायचे. त्यांच्यासोबत काम केलेले सर्व नेते, पदाधिकारी सांगतात की, ते नेहमीच मोकळे-ढाकळे वागायचे व तसेच राहायचे. त्यामुळेच त्यांनी अनेक लोक जोडली गेली होती.

वसंतदादा पाटील एक बहुआयामी व्यक्तीमत्व-

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी – असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.

२५ वर्षे सांगलीचे प्रतिनिधित्व –

वसंतदादा स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीत ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे 25 वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले.  राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी,असे दादांबद्दल म्हटले जाते. महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले.

राज्याच्या विकासासाठी सत्यशोधन समिती,विदर्भ-मराठवाडा अनुशेष संज्ञा समोर आल्या –

१९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या.

 वसंतदादा यांचा अल्प परिचय-

वसंतदादांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावात 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला.  वसंतदादांनी मुख्यमंत्रीपद 17 मे 1977 ते 18 जुलै 1978 आणि नंतर 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985 या कालखंडात ते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले. त्याआधी ते 1972 मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.1985 ते 1987 या काळात ते राजस्थानचे राज्यपाल राहिले. 1 मार्च 1989 रोजी वसंतदादांचे मुंबईत निधन झाले.

रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात शालेय शिक्षणाची गंगा नेली. पुढे त्या खेड्यातल्या शिकलेल्या मुलांना इंजिनिअरींग-वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिक्षणाची दारे वसंतदादांनी खुली केली.

पाणी आडवा, पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच महाराष्ट्राला दिला. कोरडवाहू महाराष्ट्र बागायती करण्यासाठी हा त्यांचा मंत्र राज्याच्या सिंचनाला दिशा देणारा ठरला. आज उसाच्या मळ्यांनी पश्चिम महाराष्ट्र हिरवागार झाला आहे.

वसंतदादा हे स्वातंत्र सेनानी होते. क्रांतीकारक, सातरच्या भूमिगत प्रतिसरकारच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता.

दादांनी आपल्या काळात महाराष्ट्राला एक संस्थात्मक राज्य बनविले. सहकार क्षेत्रात आज महाराष्ट्र जो काही त्यांत वसंतदादांचे मोठे योगदान आहे.       पाणी आडवा पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच दिला. दादांचे शिक्षण कमी होते पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षणसंस्था काढण्याचा मार्ग त्यांनीच दाखवला. त्याचमुळे महाराष्ट्र आज शिक्षण, सहकार, शेती क्षेत्रात अग्रेसर आहे.

वसंतदादा यांची एक जुनी घटना ती आजच्या नेत्यांना प्रेरणा देणारी-

आजच गतिमान राजकारण पाहून जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलेल्या नेत्यांच्या गोष्टी आठवत राहतात. आमच्या गावातील एका पुढाऱ्याने सांगितलेली ही गोष्ट आहे. ही वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंरची एक घटना आहे.
रस्त्यावरून एक ट्रक चाललेला . ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत निघाले होते. रानातून घरी चाललेल्या एकान त्या ट्रकला हात करत विचारलं.
“काय झालय?”
“आर , आपलं दादा मुख्यमंत्री झाल्याती” ट्रकमधल्या माणसानं सांगितलं.
“आपल  वसंतदादा?”
“होय . ”
“मग चला मीबी येतो ”
“आर पण तुझ्या अंगावर ही रानातली कापड हायती”
“त्येला काय हुतंय. आपुन दादास्नीच भेटायचं हाय. दादा आपलच हायती.” अस म्हणत तो माणूस अंगावर असणाऱ्या फाटक्या बंडीवर आणि मळक्या धोतरावर मुंबईला निघाला .
शेकडो मैलाचा प्रवास करून ही गावाकडची माणस दादांच्या बंगल्यावर पोहचली .दादा अजून येणार होते म्हणून वाट पाहत बैठकीच्या खोलीत बसली. बसली . काही वेळानं दादा आले . आल्या आल्या त्यांचे लक्ष या नुसत्या बंडीवर आलेल्या कार्यकर्त्याकडे गेले . दादांनी त्याला विचारलं ,
“हरिबा असा कसा आलायस ?शर्ट कुठ आहे ?”
“दादा , तुम्ही मुख्यमंत्री झालेलं रस्त्यात कळलं .आता घरी कवा जावू आणि कापड कवा घालू ? तवर ही माणस निघून आली असती . म्हणून तसाच आलू.”
ते ऐकून दादा हेलावले . त्यांनी लगेच त्याच ठिकाणी आपल्या अंगातील शर्ट काढला आणि त्या हरीबाला घालायला दिला. दादा आत गेले दुसरा शर्ट घालून आले . आपल्या कार्यकर्त्याचे भोळे भाबडे प्रेम पाहून त्याला आपल्या अंगातील शर्ट काढून देणाऱ्या वसंतदादा हे लोकांना आठवत राहतात आणि त्यांच्या साधेपणाच्या कथा आजही घराघरातून सांगितल्या जातात.
आजचे नेते सामान्य माणसांच्या प्रश्नांला फारसे महत्व देत नाहीत. एखादा गरीब माणूस जर स्वतःची समस्या घेऊन नेत्याकडे गेला तर नेता बोलायच्या अगोदर नेत्याच्या भोवती बसलेले त्याचे अनुयायीच त्या माणसावर खेकसतात, म्हणतात”हे काम सायेबांना सांगतोयस?काय किमंत घालवतोय काय आमच्या सायेबांची”हे अनेकांनी अनुभवलेलं असतं. साहेब आणि त्यांच्या अनुयायांना किरकोळ वाटणार काम त्या माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं. अशा साहेबांच्यासाठी आणि त्याच्या भोवतीच्या लोकांसाठी वसंतदादा पाटील यांचा एक किस्सा आवर्जून सांगितला पाहिजे.
एकदा काय झालं दादांचा एक बालमित्राला विहिरीवर बसवायचं इंजिन घ्यायच होत. तो पैसे फेट्यात बांधून थेट मुंबईला गेला. चौकशी करत करत त्यांच्या बंगल्याच्याजवळ गेला.त्याला पोलीस आत सोडत नव्हते. तो तिथंच उभा राहिला. योगायोगानं दादा कुठेतरी बाहेर निघालेले. या मित्रानं त्यांना जोरानं हाक मारली
“वसंता है….
ती गावाकडच्या माणसाची हाक ऐकून दादांनी मागे वळून पाहिले. दादा त्याच्याकडे आले.कडकडून मिठी मारली. ज्या पोलिसांनी त्याला अडवले होते. ते हा प्रसंग पाहून चकित झाले. अधिकारीही अवाक झालेले. राज्याचे मुख्यमंत्री एका शेतकऱ्याची गळाभेट घेत होते.
त्यांनी विचारलं
“अस अचानक कसा आलास?”
“वसंता, गेल्यासाली हिर पाडली. पाणी लागलंय चांगल.औंदा इंजन बसवायचं हाय. तुझ्या ओळखीन म्हटलं चांगलं इंजेन मिळलं,म्हणून आलूया”असं म्हणत त्यांनी फटक्यातलं नोटांचा पुडका दादांच्या हातात दिला.दादा त्याला म्हणाले,”राहूदे ठेव तुझ्याजवळ. आता आलास तर दोन दिवस रहा”
त्या गावाकडच्या मित्राला आपण इंजिन खरेदी करायचं काम मुख्यमंत्र्यांना सांगतोय याच काहीही वाटत नव्हतं.कारण दादा त्याला आपले वाटत होते. आणि दादानाही त्यानं हे काम सांगितलं यात कसलाही कमीपणा वाटत नव्हता. दादा हे दादाच होते. दादांनी त्याच इंजिन घेऊन त्याच्या घरी पाठवलं.आणि सांगलीला जाताना त्याला सोबत घेऊन गेले.विशेष म्हणजे दादांनी ही गोष्ट जाहीर सभेत कधी सांगितली नाही. प्रचारात सांगितली नाही, या घटनेची जाहिरात केली नाही. कारण अशा कित्येक गोष्टी होत्या सागण्यासारख्या.कोणत्या गोष्टी सांगायच्या?आजचे नेते असे वागत नाहीत आणि चुकून कोणी वागले तर त्याची बातमी होते. दादांच्या आयुष्यात बातमी बनण्यासारख्या शेकडो गोष्टी घडल्या. पण त्याच्या बातम्या झाल्या नाहीत. पण त्या सगळ्या आठवणी लोकांनी अंतःकरणात जपून ठेवल्या आहेत.

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी वसंतदादा पाटील यांच्यावर लिहलेल्या “सर्वांचे दादा” या पुस्तकाचे प्रकाशन जन्मशताब्दी समारोप समारंभात गेल्या वर्षी (13 नोव्हेंबर 2017) रोजी मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर येथे झाले होते. यावेळी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, रामशेठ ठाकूर एकत्र आले होते.

संपूर्ण