प्रहारच्या एन्ट्रीने तेल्हारा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार!

तेल्हारा तालुक्यात सत्ताधारी पक्षांचा मनमानीपणा , विरोधकांची निष्क्रियता या दुहेरी पाटात मतदार भरडून निराश झाला आहे, याचाच फायदा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने तेल्हारा तालुक्यात विविध शेतकरी मेळावे , जाहीर सभांचे आयोजन करून युवक वर्ग व शेतकऱ्यांना सत्ताधाऱ्यांच्या ध्येय धोरणावर टीका करून आकर्षीत केल्याने,प्रहार कडे आता आशेने बघितले जात आहे.यामुळे प्रहारच्या एन्ट्रीने तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तालुक्यातील तेल्हारा नगर पालिकेत भाजपाला सत्ता देत नगराध्यक्षांची निवड करतांना मतदारांनी भरभरून मते दिली होती. लोकसभा विधासभेच्या निवडणुकीतही भाजपच्या उमेदवारांनाच तालुक्यातील मतदारांनी सर्वाधिक मते दिली होती. तर जिल्हापरिषद पंचायत समितीमध्ये तालुक्यातील मतदारांनी सत्तेची सूत्रे भारिप बमसला एकहाती सोपिवली होती. नगर पालीकामध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, भारिप बमसचे दोन, कॉंग्रेस व शिवसेनेचे शून्य, शेतकरी पॅनेलचे सहा, तर तेल्हारा विकास आघाडीचे तीन सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. भाजपा व शेतकरी पॅनेलमध्ये युती असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी सत्ताधारयाची साथ पकडून सत्तेत आहेत. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांची संख्या बारा आहे तर भारिप बमस व तेल्हारा विकास आघाडीचे पाच नगरसेवक विरोधी आहेत.

तेल्हारा पंचायत समितीमध्ये एकूण १४ सदस्य संख्यापैकी भारिप बमसचे दहा, भाजप चे दोन, तर कॉंग्रेस व शिवसेना यांचे प्रत्येक एक सदस्य आहे. जिपच्या तालुक्यातील सात सदस्य संख्यापैकी भारिप बमस पाच, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप प्रत्येकी एक सदस्य असून कॉंग्रेस व शिवसेना यांच्या सदस्य संख्या शून्य आहे शहरात नपा कार्यक्षेत्रात भाजपा शेतकरी पॅनेल व राष्ट्रवादी कॉंग्रेस या सत्ताधाऱ्यानी निवडणुकीच्या वेळेस मतदारांना दिलेले वचननामे पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. तर त्यांना धारेवर धरण्याची जबाबदारी असलेले भारिप बमस व तेल्हारा विकास आघाडीचे विरोधी नगरसेवक सुद्धा त्यांच्या अंकुश ठेवण्यात अपयशी ठरले आहेत.

नगरपालिकेला नागरिकांच्या समस्येबाबत निवेदन देण्यापलीकडे शिवसेनेने सुद्धा काहीच केले नाही. तर कॉंग्रेस पक्षाचे शहरातील अस्तित्व आहे किंवा नाही एक कोडेच आहे. या सर्व बाबीमुळे शहरातील नागरिक निराश झाला आहे. ग्रामीण भागातील विकासाची जबाबदारी असणाऱ्या पंचायत समितिची अवस्था तर यापेक्षाही बिकट आहे. स्पष्ट बहुमताने निवडून आलेल्या भारिप बमस सुद्धा ज्या बहुजनांनी मोठ्या उमेदीने निवडून दिले त्यांचीच कामे होत नसल्याची चित्र आहे. पंचायत समिती मध्ये दलालांचे साम्राज्य असून लोकप्रतिनिधी ठेकेदार बनले आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचे वचक नसून कर्मचाऱ्यांच्या दांड्या मारणे, बाहेर ठिकाणावरून अप डाऊन करणे हे नित्याचेच झाले आहे.
ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतण्याची वेळ येते पंचायत समिती मध्ये कॉंग्रेस भाजपा व शिवसेना या विरोधी सदस्यांकडून कुठलाच विरोध होत नसल्याने सत्ताधाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांचे अंकुश नसल्याने व विरोधीपक्ष निष्क्रिय ठरत असल्याने तालुक्यात विरोधी पक्षाची एक पोकळी तयार झाली आहे. तालुक्यातील तळेगाव बाजार येथील विनोद खारोडे या युवा शेतकऱ्याने वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे त्रस्त होवून वीज वितरण कंपनीच्या हिवरखेड कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्या वेळेस आमदार बच्चू कडू यांनी तालुकाभर यात्रा काढून लोकवर्गणीतून मृतक शेतकऱ्याच्या शेतात सौर उर्जेचा पंप बसवीत तालुक्यात प्रहारची दमदार एन्ट्री करून दिली होती. त्यानंतर तालुक्यात विविध प्रश्न उचलण्याचा प्रहार संघटनेने सपाटाच लावल्याने नागरिक या संघटनेकडे आशेने पाहू लागले आहेत. त्यांच्या या एन्ट्रीमुळे येणाऱ्या निवडणुकीत मतांचा बेरीज वजाबाकीचे गणित बदलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर प्रहारच्या या एन्ट्रीने तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

विशाल नांदोकार

                                                                         प्रजामंच,तेल्हारा जि. अकोला

                                                                               दि. 27/2/2018 

संपूर्ण