Home संपादकीय ऑनलाईन शिक्षण आणि जागृत पालकत्व(शैक्षणिक अग्रलेख)

ऑनलाईन शिक्षण आणि जागृत पालकत्व(शैक्षणिक अग्रलेख)

2365
0

               (शैक्षणिक अग्रलेख)24/07/2020
            ऑनलाईन शिक्षण आणि जागृत पालकत्व
खरं तर… शिक्षण ही अखंड प्रक्रिया आहे. परंतु शाळेतुन मिळणारे औपचारीक शिक्षण व्यक्तीच्या जीवनाला वळण व दिशादर्शन करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पडते. समाज शाळेकडे शिक्षणाचे कार्य करणारे आदर्श माध्यम म्हणून पाहतो. शाळा आणि शिक्षण यांचा जणू पृथ्वी आणि गुरुत्वाकर्षण असा संबंध आहे. पण सध्याच्या काळात मानवाच्या पाठीमागे कोरोना विषाणूच्या रूपाने मृत्यूचे भयानक अंधकारमय सावट आहे. त्यामुळे आत्ता सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षणाच्या माध्यमात परिवर्तन होऊन शाळेच्या औपचारिक व प्रत्यक्ष शिक्षणाची जागा मात्र ऑनलाईन शिक्षणाने घेतली आहे. सगळीकडे ऑनलाईन शिक्षणाचा सुर गाजतो आहे. सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी असे प्रत्येकजण शिक्षणाचे मार्ग म्हणून ऑनलाइन शिक्षणावर भर देतो आहे. मग त्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल माध्यम किंवा ऑनलाईन ई – साहित्याचा वापर करून शिक्षण घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी मोबाईल, काँप्यूटर, टी.व्ही. अशा साधनांचा ऑनलाईन शिक्षणाचे माध्यम म्हणून वापर करीत आहेत. परंतु सर्व साधारणतः सर्वांना परवडणारे ऑनलाईन शिक्षणाचे माध्यम म्हणून मोबाईलचा जास्तीत जास्त म्हणजे जवळपास शेकडा ९० एवढ्या प्रमाणात वापर होताना दिसून येतो. ज्या विद्यार्थ्यांना पालक, शिक्षक पूर्वी मोबाईलचा वापर करण्याचा प्रतिबंध करीत होते, त्यांनाच आता स्वतःच्या मुलांना, विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून शिक्षणासाठी प्रेरित करावे लागत आहे. परंतु आता शिक्षणासाठी ति काळाची गरज आहे.
तसे पाहता लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत या मोबाईलचे सर्वांनाच खूप आकर्षण आहे. एकदा मोबाईल हातात घेतला की तो सोडवा वाटत नाही. मग त्यात लहान मुले तर अगदी तहान-भूक हरवून मोबाईलला सोडण्याची इच्छाच करत नाही. त्यात भरीस भर म्हणून मोबाईल वर वेळोवेळी येणाऱ्या जाहिराती, मेसेज हे तर मनाला भुरळ घालतात. त्यामुळे मोबाईल वापरण्याचा उद्देश बाजूला राहून मोबाईल हाताळणारा दुसरीकडेच कुठेतरी आकर्षिला जातो. यातूनच पब्जी सारख्या ऑनलाईन खेळाकडे मुले आकर्षिली जातात. पर्यायाने मुलांचे अधःपतन होते. मोबाईलचा शोध हे वरदान वाटत असतांना त्याचे दुष्परिणाम होतात व तोच शाप ठरतो. जीवनाचे नुकसान होते. तसेच मोबाईल मधील काही जाहिराती, व्हिडिओ, फोटो संस्कारांना ही आव्हान देणारे असतात. त्यातून शिक्षणातून चांगले संस्कार रुजविण्याच्या कार्याला मोठे आव्हान प्राप्त होते. अशा परिस्थितीत आधीच आकर्षणाचे साधन असलेला मोबाईल ऑनलाईन शिक्षणाचे साधन म्हणून पालकांना आपल्या मुलांना द्यावाच लागतो, परंतु पालकांना आता या विषयी खूप जागृत राहण्याची गरज आहे. ऑनलाईन शिक्षणाचे कार्य हे पालकांच्या देखरेखी खालीच नव्हे, तर प्रत्यक्ष उपस्थितीतच व्हायला पाहिजे. या बाबतीत पालक जेवढे जागृत असतील तेवढेच आपल्या पाल्यांसाठी भविष्यातील मोबाईल बाबतचे धोके ते टाळू शकतील. ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांचे शिक्षण होईलच खरे परंतु शिक्षण घेता घेता ऑनलाईन आकर्षणाने भरकटत जाणाऱ्या आपल्या पाल्यांच्या सवयीला जागृत पालकत्वच यामुळेच कुठेतरी लगाम लावेल. त्यातूनच खऱ्या ऑनलाईन शिक्षणाचा उद्देश व हेतू सफल होईल आणि नेमके जे शिक्षण द्यायचे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल.

            निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
                       मुख्याध्यापक
                  जि.प. शाळा बऱ्हाणपूर,
               पं.स.मोर्शी,जि.प.अमरावती
                     मो. ९३७११४५१९५
     email [email protected]