Home अकोला तेल्हारा तालुक्यात रेती माफियांचा सूळसुळाट,महसूल प्रशासन करतेय तरी काय…?

तेल्हारा तालुक्यात रेती माफियांचा सूळसुळाट,महसूल प्रशासन करतेय तरी काय…?

360
0

सामाजिक दुरावा सोडून कोरोनाला दिले जातेय आमंत्रण
तेल्हारा, प्रजामंच, विशाल नांदोकार,5/5/2020
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना त्याच्या संक्रमणा पासून वाचण्यासाठी वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संपुर्ण भारतात ३ मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले. ह्याच संधीचा फायदा घेत तालुक्यातील वाळू माफियांनी कहर माजविला आहे. कोणतीही रॉयल्टी नसतांना नद्या पोखरने सुरू असल्याचे दिसुन येत आहे. यासाठी लागणारा मजूर हा वेगवेगळ्या परिवारातील असून सामाजिक दुरावा राखणे कठीण आहे. हेच कोरोना संक्रमणाचे कारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे याला आळा घालण्यासाठी महसुल विभागाने प्रयत्न करायला हवेत परंतु हे खाते व त्यातील अधिकारी व वाडू माफियांची मिलीभगत असल्याचे दिसून येत असल्याने हे अधिकारी तालुक्यातील वाळू चोरी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. या अभूतपूर्व गंभीर परिस्थितीत व जागतिक महामारीत महसूलच्या आशिर्वादाने लॉकडाउन चा फज्जा उडवल्या जात असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायामल्ली होत असल्याचा आरोप होत आहे. यातून निसर्गाचा ऱ्हास होऊन शासनाला लाखोंचा चुना लागत असल्याने महसूल विभाग करतेय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे
कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाउनची काटेकोर अमलबजावणी होणे अत्यावश्यक असतांना त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा जीव ओतून कार्य करीत आहे. परंतु, वाळू माफियांकडुन लॉकडाउनचा फज्जा उडवल्या जात असून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांना केराची टोपली दाखविली जात आहे. परंतु शासकीय महसूल यंत्रणेला ही वाहतूक रोखण्यात पूर्णपणे अपयश आले असल्याचे या प्रचंड वाहतुकीवरून दिसून येत आहे. तेल्हारा तालुक्यातील एकाही नदीपात्राचा अथवा वाळू घाटाचा लिलाव अद्यापही झालेला नाही. असे असले तरी देखील तेल्हारा तालुक्यातील विविध नदीपात्रातून वाळूची राजरोसपणे चोरी होत आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायामल्ली करत ही वाहतूक सुरू आहे. वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी तैनात करण्यात आलेली यंत्रणा नेमक्या कोणत्या फायद्यासाठी कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे हे सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे. रात्री ०९.०० ते मध्यरात्री ३.३० वाजता दरम्यान टाटा ४०७, टिप्पर, ट्रॅक्टर ट्रॉली आदी वाहनामधून ही वाहतुक सर्रास होत आहे. वाळूची पळवापळवी थांबविण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा गंभीर असल्याचे दिसत नाही. तेल्हारा तालुका हा वाळू चोरी व उपसा यासाठी अग्रगण्य आहे येथे अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास नसल्याने रेती व्यवसाय तेजीत सुरू असल्याची विश्वसनिय चर्चा आहे.
तेल्हारा तालुक्यातील नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून त्याची अवैधरित्या वाहतुक करून त्या वाळूची मोठया प्रमाणावर साठेबाजी करून अव्वाच्या सव्वा भावाला वाडूची विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून सर्वसामान्यांची लूट होत असून शासनाला लाखोंचा चुना लागत आहे. हा सर्व प्रकार तलाठी व मंडळ अधिकारी यांचे लक्षात येऊनही ते काहीच कार्यवाही करत नाही त्यामुळे त्यांचे वाळू माफीयाशी असलेल्या मधुर संबंधामुळेच कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरीक करत आहेत.
तालुक्यातील पूर्णा, विद्रुपा, गौतमा, वाण, आस नदीपात्र वाळू माफियांनी पूर्णपणे पोखरले आहे. आरसुड घाट १ व २, उमरी, बाभूळगाव, वांगेश्वर, वांगरगाव, दानापूर, आकोली रुपराव, हिवरखेड नदीपात्रातून वाळूची चोरी सुरू असून त्याचे इ कलासच्या जागेत साठवण करणे। सुरू असून त्या ठिकाणावरून ह्या वाळूची सर्वत्र तालुक्यात अवैध वाहतुक सुरू आहे. जागतिक महामारीच्या अभूतपूर्व संकटात सामाजिक दुरावा व लॉकडाउनची अमलबजावणी होणे आवश्यक असतांना महसूल विभागाच्या आशिर्वादाने लॉकडाउनचा फज्जा उडविला जात असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी नियमांची पायामल्ली होत असून सामाजिक दुराव्या अभावी कोरोना संक्रमाण पसरण्याची शक्यता आहे. अशातच थेट जनते समोरून राजरोसपणे लॉकडाउन चे उल्लंघन करून वाळूची चोरी व अवैध वाळू वाहतूक होत असल्याने यांना संचारबंदीचे नियम नाहीत का असा प्रश्न सर्व सामान्यांना सतावत असून त्यांचेही कडून दिवसा लॉकडाउनचे उल्लंघन होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.