Home अमरावती ड्राय झोन मोर्शी तालुक्यात दुष्काळी परिस्थितीतही फुलविली संत्रा बाग 

ड्राय झोन मोर्शी तालुक्यात दुष्काळी परिस्थितीतही फुलविली संत्रा बाग 

265
0

रुपेश वाळके यांनी घेतले 300 संत्राझाडामध्ये १४ लाखाचे उत्पन्न

मोर्शी प्रजामंच २१/२/२०२०
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश प्रकाशराव वाळके यांनी 300 संत्राझाडामध्ये १४ लक्ष रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले .
मोर्शी तालुका ड्राय झोन मध्ये असून सततच्या दुष्काळामुळे  मोर्शी तालुक्यातील पाण्याची पातळी अतिशय खालावलेली असून सुद्धा मोर्शी तालुक्यात संत्राचे विक्रमी उत्पादन घेतल्या जाते . राज्यात दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड होते. त्यातील सर्वाधिक ४९ हजार हेक्‍टर लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी परिसरांत आहे. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्नियादेखील म्हटले जाते.    रुपेश वाळके यांनी घोडदेव  येथील शेतीमध्ये   दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे. याबरोबरच संत्रा शेतीमध्ये विक्रमी  उत्पादन घेऊन त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे रुपेश प्रकाशराव वाळके असे या उपक्रमशील शेतकऱ्याचे नाव आहे.
मोर्शी तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले घोडदेव तीनशे लोकवस्तीच्या गावामध्येे नेहमीच पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता येत नाही. खरिपाचे पीक घेतल्यानंतर पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची जमिन विनापेरणी तशीच पडून राहते तर काही उपक्रमशील शेतकरी वेगळ्या पद्धतीची शेती करून भरघोष उत्पन्न घेत असल्याचेही आशावादी चित्र आहे. यामध्ये रुपेश प्रकाशराव वाळके यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पाणी फाउंडेशन मध्ये तालुका समन्वयक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणारे , जलसंधारणाचे महत्व हजारो नागरिकांना समजावून सांगणारे , हजारो नागरिकांचे मनसंधारण करून मोठ्या प्रमाणात जलसंधारण करण्यासाठी पाण्यासाठी चळवळीत सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून समाजसेवेचा वसा घेतलेले रुपेश प्रकाशराव वाळके  यांची संत्रा शेतीशी  जुळलेली नाळ व त्यातुन मातीशी जुळलेला जिव्हाळा त्यांना शेती व्यवसायाकडे घेवुन गेला. त्यांनी संत्रा शेतीमध्येच करीअर करण्याची खुनगाठ बांधुन स्वत:ला शेती व्यवसायात झोकुन दिले.
सुरुवातीच्या काळात त्यांनी आधुनिक पध्दतीने संत्रा शेती करत संत्रा पिकांचे विक्रमी उत्पादन घेवुन परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. अनेक वर्षापासुन ते संत्रा उत्पादन घेत आहेत. तीन एकर क्षेत्रफळावर त्यांनी ३०० पेक्षा अधिक संत्रा झाडाची जोपासना केली आहे. अलिकडच्या काळात भीषण दुष्काळामध्ये  पाणीटंचाई जाणवत असल्याने त्यांनी अत्यल्प पाण्यामध्ये संत्रा पीक घेतले  यावर्षी भीषण पाणीटंचाई असतानाही रुपेश वाळके  यांनी संत्रा बाग फुलविली आहे. चालु वर्षी त्यांनी या बागेतुन विक्रमी संत्रा फळाचे उत्पादन घेतले असुन त्यापासुन १४ लाख  रुपयांचे उत्पन्न मिळाले हे विशेष .
शासनाने मोर्शी वरुड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करावे ……..
मोर्शी वरुड तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मोर्शी वरुड तालुक्यात ४५ हजार हेक्टरवर विक्रमी संत्रा उत्पादन घेतल्या जाते  संत्र्यासाठी बाजारपेठेत विविध पर्याय खुले झाले असताना शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून त्याचा लाभ घेणे आवश्यक बनले आहे. पण, आता विविध रोगांचा व फळगळतीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ती रोखण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, ही शेतकऱ्यांची खंत आहे. अनेक प्रयोग करून शेतकरी आता  दमले आहेत. संत्र्याच्या बाजार व्यवस्थापनासाठी सरकारने मदत केली पाहिजे, फळबागा वाचवण्यासाठी शास्त्रज्ञांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले पाहिजे त्यासाठी मोर्शी वरुड तालुक्यामध्ये शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करणे गरजेचे आहे .