Home महाराष्ट्र सरपंचाची निवड थेट जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत सदस्य करणार !

सरपंचाची निवड थेट जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत सदस्य करणार !

1242
0

मुंबई,प्रजामंच,29/01/2020
सरपंचांची थेट जनतेतून होणारी निवडणूक राज्य सरकारने रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील भाजप सरकारने सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता.तो निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे.

राज्यात भाजपचे सरकारच्या काळात नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा भाजपला झाला होता. मात्र, या निवड प्रक्रियेमुळे सरपंच आणि सदस्य यांच्या विचारांत विसंगती येत असल्यामुळे त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचा आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला होता. जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आहेत. या सर्वांचा विकास कामांवर परिणाम होतो. जनतेतून होणारी थेट सरपंच निवडणूक रद्द करावी, अशी विधीमंडळाच्या अनेक सदस्यांनी मागणी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सरपंचपदाची थेट निवडणूक रद्द करण्याबाबत सूतोवाच केले होते.
थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द करण्याला काही ग्रामपंचायतींनी, सरपंचांनी विरोध केला होता. हा निर्णय रद्द न करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले होते. मात्र, राज्य सरकारने आपल्या भूमिकेवर ठाम रहात भाजप सरकारचा निर्णय रद्द केला आहे.