Home ताज्या बातम्या लौट आयेगी खुशिया….(शैक्षणिक अग्रलेख)

लौट आयेगी खुशिया….(शैक्षणिक अग्रलेख)

1160
0

लौट आयेगी खुशिया….(शैक्षणिक अग्रलेख) १९/०६/२०२०
मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर वृत्तपत्र बातमीचे एक कटिंग फिरत होते.’सरकारी कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजा?’ शेवटच्या प्रश्नचिन्हाने माझे लक्ष वेधून घेतले. एक विचार डोक्यात आला. खरंच असे झाले तर…! एक शिक्षिका म्हणून मी ही सरकारी कर्मचारीच ना. या बातमीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनावर काय आघात झाला असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. त्यातही शिक्षकांची संख्या सर्वात जास्त.शेवटी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांचीआर्थिक कोंडी होऊ नये, एवढेच वाटते.
खरे तर शाळा सुरू कराव्या, की नाही याबाबत सरकारचाच ठोस निर्णय होत नाही आहे. याआधी मुख्यमंत्री साहेबांनी म्हटले होते, की ‘मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही’, वेळेत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. पण दररोजची रुग्णांची वाढती संख्या बघता सारेच चिंतेत पडलेले आहे. शेवटी ‘ऑनलाइन शिक्षणाचा’ पर्याय समोर आला. पण त्यालाही खूप मर्यादा आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना शिक्षण उपलब्ध करून देणे ही सरकारची तथा पालकांची जबाबदारी आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे एकाच वर्गातील काही मुले शिकत असतिल तर सुविधे अभावी काही मुलं शिकू शकणार नाहीत. जेथे पालकांकडे स्मार्टफोन नाही, इंटरनेट सुविधा नाही, अशा ठिकाणी हा पर्याय कुचकामी ठरणार आहे. देशात ‘स्माईलफाउंडेशन’या NGO ने केलेल्या अभ्यासानुसार 56% मुलांकडे ई-लर्निंग ची साधने नाहीत. तसेच 31 टक्के मुलांकडे टीव्ही नाही. कदाचित यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिमोट एरियातील शाळा परिस्थिती बघून सुरू करण्यात येतील, असे सूतोवाच केले.
एक शोकांतिका वाटते. शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. पण आज कोणतेही शैक्षणिक निर्णय घेतांना शिक्षकांचा विचार होत आहे का ? शाळा सुरू झाल्या, तर शिक्षक आनंदानेच काम करतील. आजपर्यंत किती तरी आव्हाने पेलत शिक्षकांनी आपले कर्तव्य चोख बजावले आहे.पण शैक्षणिक सत्र 2020-21 आव्हानांनी भरलेले असेल. येथे शिक्षकांची चांगलीच कसोटी लागणार, यात शंकाच नाही.टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या, तेव्हा शैक्षणिक सत्र संपत आले होते. परीक्षा तेवढ्या बाकी होत्या. त्यामुळे फारसे शैक्षणिक नुकसान झाले नाही. आता नवीन सत्राची सुरुवात होणार, त्याच वेळी कोरोना महामारीने रौद्ररूप धारण केले आहे.
“शाळा कधी सुरू होणार?” असा प्रश्न चिमुकले आपल्या पालकांना विचारत आहेत. पण धास्तावलेले पालक मुलांना शाळेत पाठवतील की नाही,हीशंकाच आहे. मुलांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेची हमी कदाचित शिक्षकांना द्यावी लागेल.शाळेत मुलांना मास्क, सॅनिटायझर , हँडवॉश, सॅनिटायझर मशीन यासारखी साधने उपलब्ध करून घ्यावी लागतील. पण शासनाने सर्व खर्चात कपात करण्यास सुरुवात केल्यामुळे हा भार शिक्षकांनाच उचलावा लागू शकतो.
टाळेबंदीच्या काळात शहरात मजुरी करून जगणारे अनेक कामगार, मजूर काम बंद झाल्यामुळे गावाकडे परतले आहेत. अशावेळी शहरातील शाळा ओस पडून शिक्षक अतिरिक्त होण्याचे संकट ओढवू शकते. त्यामुळे शहरातील शाळा टिकवणे हे एक आव्हान शिक्षकांसमोर असेल. त्याउलट गावात शाळेतील पटसंख्या फुगून अतिरिक्त ताण शिक्षकांवर येऊ शकतो.मुलं शाळाबाह्य राहणार नाही. सर्वांना दर्ज करून घेणे ही एक जबाबदारी वाढलेली असेल. काहींच्या मते शाळा उशिरा सुरू करावे आणि अभ्यासक्रम कमी करून नियोजन करावे. मला असे वाटते, की अभ्यासक्रम कमी करण्यापेक्षा पाठ्याक्रमाचे योग्य नियोजन करून, इयत्तावार ठरलेली उद्दिष्टे प्राप्त होण्यासाठी थोडे कमी पण प्रभावी असे अध्ययन अनुभव यांचे नियोजन करावे लागेल, आणि त्याला शैक्षणिक साहित्याची जोड द्यावी.
इस्त्रायल देशात शाळा सुरू केल्यामुळे तेथील विद्यार्थी कोरोनाच्या संसर्गात आले. असे आपल्याकडे होऊ नये, यासाठी खूप दक्षता घ्यावी लागेल. शिक्षकांची जबाबदारी खूप जास्त वाढलेली असेल.कोरोना आपली पाठ खूप लवकर सोडेल असे वाटत नाही, कारण WHO च्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू भविष्यात बरेच दिवस आपल्या सोबत राहणार आहे. तेव्हा त्याच्या सोबत जगण्याची सवय करून घ्या. खेळण्याच्या दुनियेत रमणाऱ्या या छोट्या दोस्तांना मास्क वापरणे, सोशल डिस्टंसींग पाळणे,सॅनिटायझर वापरणे, वारंवार हात धुणे या सवयी लावणे खूपच कठीण जाणार आहे. वर्गात गर्दी न करता स्वतःची काळजी कशी घ्यायची, संसर्ग कसा टाळायचा याचे धडे देताना शिक्षकांची चांगलीच दमछाक होणार आहे. पाठ्यक्रम शिकवतांना वरील सवयींचे महत्त्व पटवून देणारे उपक्रम सुद्धा राबवणे क्रम प्राप्त असेल.
परिस्थिती खूप बिकट आहे. आव्हाने खूप मोठी आहेत. अशावेळी शिक्षकांनी मात्र तयार राहायचे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांचे तीन दिवसाचे नुकतेच प्रशिक्षण झाले आहे. नवीन आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी समुपदेशन करणे, ऑनलाईन शिक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी योग्य तांत्रिक कौशल्य जसे- अॅनिमेशन, प्रेझेंटेशन, व्हिडीओ क्लिप कसे तयार करावे, हे शिकविणे. तसेच फेसबुक,झूमअॅप, हॅगआउट, गूगलमीट, गुगलक्रोम, ट्विटर, टेलिग्राम, व्हाट्सअॅप आदिंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविणे. हे सगळे धडे आता शिक्षकांना घ्यावे लागेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. पण मानवी स्वभाव एकदम कोणतेही परिवर्तन स्वीकारत नाही. विद्यार्थी आपले ‘दैवत’ आहे, त्यांच्यासाठी नवीन बदल स्वीकारून एक नव्या स्वरूपातील ‘गुरुजी’ समाजात दिसेल.
Covid-19 महामारीमुळे सगळीच क्षेत्रे प्रभावित झालीत. शिक्षण क्षेत्रही त्यातून सुटले नाही. त्यामुळे बरेच नवीन बदल होतील. त्यातील स्वीकार्यबदल कायम ठेवत,पुढील नवी शिक्षणपद्धती नावारूपाला येईल.‘Nothing stand still in this world.’ पुढे भविष्यात आपण या महामारीतूनमुक्त झालेले असू. सगळे सुरळीत झालेले असेल. त्यासाठी आज न घाबरता, न डगमगता सामना करायचा आहे एका अदृश्य शत्रूचा जूलैपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाआहे.त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे राज्य सरकारने ठरविली आहेत. शासनाने सर्वांसाठी घेतलेल्या योग्य निर्णयांचे स्वागतच राहील. आपलीच नाही,तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सांभाळून, येणाऱ्या प्रत्येक आव्हानांसाठी तयार राहूया. कारण हे दिवस ही निघून जातील……
लौट आयेगी खुशिया,अभी कुछ गमो का बाकीशोर है,
जरा संभलकर रहो अजिजो, ये इम्तिहान का दौर है|
योगिता जिरापुरे (शिक्षिका)
                             धारणी, जि.अमरावती.
                                मो.9766965516