Home आपला मेळघाट मेळघाटात बाहेरून आलेल्या शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱयांना १० दिवसाचे विलगीकरण, मुख्यालय बंधनकारक

मेळघाटात बाहेरून आलेल्या शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱयांना १० दिवसाचे विलगीकरण, मुख्यालय बंधनकारक

1129
0

धारणी प्रजामंच,27/6/2020 
२६ जूनपासून शिक्षकांना शाळेवर उपस्थित राहणे आवश्यक असल्याने बहुतेक शिक्षक कर्तव्यावर हजर झाले,मात्र मेळघाटात मोठ्या प्रमाणात बाहेरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याने रेड झोन व नॉन रेड झोन मधून मेळघाटात आले आहे. अश्या जवळपास एक हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मेळघाटात दाखल झाले आहेत. त्या सर्व कर्मचाऱयांना १० दिवसासाठी विलगीकरण केंद्रात पाठविण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकरी मित्ताली सेठी यांनी आदेश काढले आहे. मात्र या आदेशाची चाहूल लागताच काही शिक्षक मंडळी पोबारा झाल्याची माहिती सुध्दा हाती येत आहे.
रेड झोन मधून आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून थ्रोट स्वाब तपासणी अहवालसह, १० दिवसांकरिता संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवणे बंधनकारक आहे. नॉन रेड झोन मधून आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होम विलगीकरण करण्यात यावे, तसा अहवाल गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणे अपेक्षित आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे बाहेरगावावरून आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अप- डाऊन करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून अति महत्त्वाच्या कामासाठी गटविकास अधिकारी यांच्या परवानगी शिवाय कोणाला हि मुख्यालय सोडता येणार नाही. असे आढळल्यास प्रशासकीय कार्यवाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या आदेशाचे सामान्य जनतेत स्वागत केले जात असून कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाचे योग्य पाऊल असल्याचे नागरिकांचे मत आहे.