Home वर्धा भरचौकात तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली एक आरोपी अटक, २ फरार

भरचौकात तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली एक आरोपी अटक, २ फरार

735
0

वर्धा प्रजामंच,3/2/2020
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भरचौकात प्राध्यापक तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका माथेफिरू कडून करण्यात आला असून यामध्ये तरुणी 40 टक्के जाळल्याची माहिती आहे, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंगणघाट परिसरातील नंदोरी चौकातील घटना असून पीडित तरुणी तुळसकर कॉलेजची प्राध्यापिका आहे. आरोपी विकेश नगराळे व इतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला परंतु, पोलिसांनी काही मिनिटांमध्ये मुख्य आरोपी विकेश नगराळे अटक केली. त्याच्यासोबत इतर दोन जण अद्यापही पसार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पीडित तरुणीचा चेहरा पूर्णपणे भाजला आहे. तसेच शरीराच्या उर्वरीत भागांवर सुद्धा अतिशय गंभीर जखमा आहेत. तिची अवस्था अतिशय चिंताजनक आहे.
आरोपी विवाहित, रोज करायचा पाठलाग
प्राथमिक माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी हा विवाहित आहे. तसेच तो नेहमीच बसमध्ये जात असताना पीडितेचा पाठलाग करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने तरुणीशी बोलण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तरुणीने याचा विरोध केला आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर सोमवारी सकाळी ती दैनंदिन प्रमाणेच कॉलेजला जात होती. या दरम्यान नंदोरी चौकात पायी असतांना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि अचानक तिच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली.
गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सोबतच, ट्विट करून त्यांनी यासंदर्भात माहिती देतांना कडक कार्यवाहीचे आश्वासन दिले. “वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय असून पोलीस अधीक्षक वर्धा यांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत, संबंधितांवर लवकरात लवकर कडक कारवाई होईल.” असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.