Home अमरावती गांधीजयंतीला ग्रामसभेत गावोगावी मतदार जागृती –  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा...

गांधीजयंतीला ग्रामसभेत गावोगावी मतदार जागृती –  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री

1124
0

अमरावती, प्रजामंच 25/09/2019

गांधीजयंती अर्थात 2 ऑक्टोबरला होणा-या ग्रामसभांतून ‘चुनाव पाठशाळा’ घेण्याचे निर्देश स्वीपच्या नोडल अधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिले असून, यादिवशी गावोगाव प्रभातफेरीही काढण्यात येणार आहे.

या चुनाव पाठशाळेत गावातील मतदारांसह महिला मतदार, दिव्यांग मतदार व नवमतदारांचा सहभाग मिळवावा. पाठशाळेचा प्रारंभ प्रभातफेरीने करावा. मतदान केंद्रनिहाय पाठशाळा आयोजित करण्याचा प्रयत्न व्हावा. पाठशाळेत नागरिकांना मतदानाचे महत्व, निकोप लोकशाहीसाठी निर्भिड मतदान महत्व, महिलांना, तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधा याबाबतची माहिती द्यावी, असे निर्देश श्रीमती खत्री यांनी दिले आहेत.

दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार केंद्रावर पोहोचविण्यासाठी जे स्वयंसेवक नियुक्त केलेले आहेत, त्यांची नावे व मोबाईल क्रमांकाची माहिती पाठशाळेत द्यावी. यानिमित्त विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करावे. ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आदींचा सहभाग आवश्यक आहे.  यादिवशी शाळा, ग्रामपंचायत किंवा गावातील मुख्य ठिकाणी सामूहिक, तसेच वैयक्तिक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. शाळा- महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.