Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील तीन हजारांवर फलक हटविले,आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी

अमरावती जिल्ह्यातील तीन हजारांवर फलक हटविले,आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी

1109
0

अमरावती, प्रजामंच,26/09/2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 21 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाकडून अमरावती जिल्ह्यात आचारसंहितेचे अंमलबजावणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून तीन हजार 805 फलक, पोस्टर, बॅनर आणि 1 हजार 816 झेंडे हटविण्यात आले आहेत.

अमरावती जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणीसाठी शासकीय जागेवरील, आवारातील व शासकीय इमारतीवरील पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्स, रंगविलेल्या भिंती, झेंडे काढून टाकण्याचे प्रशासनाकडून निर्देश दिले आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे ठिकाण बसस्टॅन्ड, एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन, रेल्वेब्रिज, रस्ते, बसेस, विद्युत पोल व टेलिफोन पोल, स्थानिक स्वराज्य संस्थांची इमारत आणि खाजगी मालमत्तेच्या जागेवरील व इमारतीवरील अनाधिकृत राजकीय पक्षाचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्स, रंगविलेल्या भिंती, झेंडे काढून टाकण्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी निर्देश दिले आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, तक्रार प्राप्त झाल्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले.

निवडणूकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली. फलक, पोस्टर्स, होर्डिग्ज, बॅनर्सवरील राजकीय पक्षाचे मजकूर हटविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. विधानसभा मतदारसंघनिहाय हटविलेल्या पोस्टर्स, बॅनर्स व होर्ल्डींग व झेंड्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. धानणगाव रेल्वेतून 1447 पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज व 510 झेंडे, बडनेरातून 412 पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज व 157 झेंडे, अमरावती तालुक्यातून 117 पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज व 55 झेंडे, तिवसातून 150 पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज व 132 झेंडे, दर्यापूर येथून 242 पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज व 348 झेंडे, मेळघाटातून 116 पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज व 150 झेंडे, अचलपूर येथून 1111 पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज व 200 झेंडे तर मोर्शी येथून 210 पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिग्ज व 200 झेंडे हटविण्यात आले आहे.

नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासंबंधी तक्रारीबाबत जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख उद्या 27 सप्टेंबर असून, नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम 4 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी 5 ऑक्टोबरला होईल. उमेदवारी मागे घेण्याची 7 ऑक्टोबर आहे. मतदानाचा दिनांक 21 ऑक्टोबर तर मतमोजणीचा दिनांक 24 ऑक्टोबर आहे.27 ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.