Home संपादकीय योगा- जिवनाची आदर्श दिशा….

योगा- जिवनाची आदर्श दिशा….

927
0

योगा- जिवनाची आदर्श दिशा…. (21/06/2021)
मनुष्य आजारी पडला, की त्याच्या आजारावर विविध उपचार पद्धती अमलांत आणल्या जातात. ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, युनानी, योगा. (तसेच आजकाल उपलब्ध असलेल्या विविध थेरपीज) अशा प्रकारे विविध उपचार पद्धतींच्या उपयोग करून व्यक्तीला बरे केले जाते. त्यातील ‘योगा ‘ ही उपचार पद्धती बहुतांश आजारांवर एक महत्वपूर्ण उपचार पद्धती समजली जाते. योगा व प्राणायाम मानवी शरीरातील प्रत्येक अवयवाला शुद्ध करते. आजारांशी सामना करण्याची शक्ती प्रदान करते. सोबतच ताणतणावातून मुक्त करते. इतर उपचारपद्धती बहुतांश महागड्या आहेत, पण योगा व प्राणायाम यांना फारसा पैसाही लागत नाही आणि कोणत्याही वयातील, कोणत्याही स्तरातील व्यक्ती सहज ते करू शकते. म्हणूनच प्रत्येकाने योगाकडे वळले पाहिजे. शरीर व मन अंतर्बाह्य शुद्ध करण्याबरोबरच मनुष्याला तात्विक बळ मिळते. शरीरातील विविध व्याधींना मुळापासून नष्ट करण्यासाठी योगा ही पद्धती महत्त्वाची ठरते.
पोटाची भूक शमविण्याच्या नादात आज प्रत्येक जण शरीरस्वास्थ्य विसरत चाललाय. मानवी शरीर हे अनंत रोगांचे ठिकाण होत चालले आहे त्यामुळे आरोग्य ढासळले आहे. योगाभ्यास केवळ आजारातून मुक्तीच देत नाही, तर योगामुळे आत्मविश्वास वाढतो, सर्वांगीण समतोल प्राप्त होतो. योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय होय. योग जीवनातील मानसिक ताणतणाव कमी करून शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो. ती एक अध्यात्मिक वाट आहे, ज्यावर चालून आपण आपले इच्छित ध्येय गाठू शकतो. पण त्या वाटेवरून चालताना नियम मात्र पाळावेच लागतात.
योगा करण्याने सात्विक वैचारिक पातळीचा उच्चांक गाठला जातो. सात्विक जीवनशैली, संस्कारक्षम नियंत्रित मन आणि सात्विक विचार या तिघांचा एकत्रित परिणाम व्यक्तिमत्त्वाला एक आगळे वेगळे परिमाण देतो. मनुष्याला 70 टक्के पेक्षा जास्त रोग होण्याचे कारण हे आजची बदललेली जीवनशैली आहे. त्यावर योगा आणि प्राणायाम महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे तुमचे जीवन आनंदी आणि सुखी होऊन रोगांचे प्रमाण 30 टक्के पर्यंत कमी होते.
युवक असो वा वयोवृद्ध. निरोगी असो की आजारी. योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायक आहे. प्रगती कडे जाण्याचा सहज व सुलभ असा मार्ग आहे. त्याचे अनुसरण प्रत्येक जण करू शकतो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते.
योगा हा कधीच नवीन नव्हता. खरेतर बालपणापासूनच हे आपण करत आलेलो आहे. पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो, वा पचनशक्ती वाढविणारे पवनमुक्तासन असो. आपण लहान मुलांना रोज काही ना काही योग क्रिया करताना पाहतो. प्रत्येकाच्या जीवनात योगाचे महत्त्व वेगळेवेगळे पण आवश्यक आहे. योगा हा प्रत्येकाच्या जीवनाची आदर्श दिशा ठरविण्यासाठी सहाय्य करणारा एक दृढ संकल्प आहे.
प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वासाच्या योग्य तंत्राचा सराव केल्यास रक्तामधील मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन उर्जा ह्यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगा हे एकमेकांना पूरक आहे. प्राणायाम ही ध्यानाच्या अनुभवाची सुरुवात असते. या दोन्हीचा मिलाफ झाल्याने शरीर व मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते.
भारतीय संस्कृतीत योग, योगासने, योगसाधना, प्राणायाम यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असतांना तर योग दिनाला आणि एकंदरीतच योगाभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंतर्भाव नक्कीच करावा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला योगाकडे वळण्याचा मंत्र दिला आहे. जोपर्यंत कोरोनावर औषध येत नाही, तोपर्यंत त्यापासून बचाव करणेच ठीक होईल आणि हा बचाव योगाच्या योग्य पद्धतीने केल्यास अतिउत्तम होईल.
आज प्रत्येकाने किमान एक तास तरी स्वतःला द्यावा, असे मला वाटते. बहुतांश वेळी महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. रोजच्या दैनंदिन घरातील कामामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, पण कितीही धकाधकीचे जीवन असू द्या, एकदा का मनुष्याला स्वची जाणीव झाली, की मग स्वतःसाठी अर्धा ते एक तास वेळ नक्कीच काढतील. योगा हे आपले जीवन होऊन गेले पाहिजे. तेव्हाच त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल आणि कितीही मोठ्या व्यस्ततेतून योगा साठी वेळ राखून ठेवला जाईल. सुखी जीवन जगणे, ताणतणावातून मुक्ती, विविध आवेगातून मुक्ती मिळवण्याची योगा हे प्रभावी माध्यम आहे. योगाला अंतरमनाच्या यात्रेसाठी, तसेच चेतनेच्या विकासासाठी महत्त्वाच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 ला झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे ठरले.
21 जून 2015 रोजी सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगात साजरा झाला होता. मागच्या वर्षी प्रथमच योग दिन डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म या माध्यमातून साजरा झाला होता. कदाचित या वर्षीही डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्मचा उपयोग जास्तीत जास्त होऊ शकतो. Covid मधून बरे झाल्यानंतर बऱ्याच लोकांना योगाचा खूप फायदा झाला. त्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे. दरवर्षी एक वेगळी थीम घेऊन योगा दिवस साजरा केला जातो. मागील वर्षाची 2020 ची थीम होती ‘घरी राहून योगा करा’ म्हणजे ‘योगासह घरी राहा ‘ तर यावर्षी 2021 ची थीम आहे ‘बी विद योगा, बी एट होम ‘ अर्थात ‘ योगासह राहा, घरी राहा’.
काळानुसार योग एका आचरण पद्धतीच्या रुपात प्रसिद्ध होत गेला. भगवत गीतेसह महाभारतातील शांतीपर्वामध्ये योगाचा खुलासेवार उल्लेख आढळतो. ती एक आदर्श जीवन प्रणाली आहे. याचा प्रत्येकाने अवलंब केला पाहिजे आणि आपले जीवन आनंदी व सुखी केले पाहिजे.
‘करो योग, रहो स्वस्थ’
योगिता जिरापुरे (शिक्षिका)
                              अमरावती.
                            मो.9766965516